राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा लांबणीवर पडणार, स्थायी समितीच्या आक्रमक भूमिकेमुळे कबड्डीतल्या बाबुरावांचे धाबे दणाणले

नेहमीच कबड्डीसाठी जिवाचे रान करणाऱया बाबुराव चांदरेंनी आपली मनमानी चालवतानाही घटनाबाह्य केलेला कारभार पूर्वपदावर आणण्यासाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेने (एमओए) जाहीर केलेली अस्थायी समिती आक्रमक झाली आहे. त्यामुळे ‘एक जिल्हा एक संघ’ असा नियम असताना स्वतःच्या फाऊंडेशनचे खेळाडू राज्य संघात वाढावेत म्हणून घटनाबाह्य पद्धतीने वाढवलेले संघ आणि आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी तडकाफडकी मार्चमध्ये जाहीर केलली राज्य अजिंक्यपद स्पर्धा याबाबत अस्थायी समिती ठोस पावले उचलणार का, असा प्रश्न कबड्डी संघटकांच्या मनात निर्माण झाला आहे. चांदेरेंनी घटनाबाह्य केलेली प्रत्येक गोष्ट अस्थायी समितीने खोडून काढावी, राज्य अजिंक्यपद घाईगडबडीत परीक्षा काळात घेऊ नये, असा जिल्हा संघटकांचा दम घुमू लागल्यामुळे अस्थायी समिती ही स्पर्धा पुढे ढकलणार का, असा सवाल निर्माण झाला आहे. याबाबत अस्थायी समितीच्या गुरुवारी होणाऱया बैठकीत चर्चा आणि निर्णय होऊ शकतो, याचीही उत्सुकता आहे.
अस्थायी समितीने चांदरे यांची मनमानी मोडून काढण्यासाठी त्यांची सही असलेले कोणतेही परिपत्रक, पत्रव्यवहार आणि प्रमाणपत्रे ग्राह्य धरली जाणार नसल्याचे राज्यातील सर्व जिह्यांना कळवले आहे. त्यामुळे त्यांनी आठवडाभरापूर्वी जाहीर केलेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेबाबतही अनेक शंकाकुशंका निर्माण झाल्या असून अस्थायी समिती राज्यातील सर्व जिल्हा संघटनांशी चर्चा करून ही स्पर्धा तत्काळ न घेता परीक्षा संपल्यानंतर घेता येईल का याबाबत चाचपणी करणार आहे. त्याचप्रमाणे दोन वर्षांपूर्वी प्रायोगिक तत्त्वावर वाढवलेले जिल्हा संघ विसर्जन करायचे की पुढेही ते कायम ठेवून बाबुराव चांदेरेच्या मनमानी कारभाराला अस्थायी समिती साथ देणार? याकडेही कबड्डीच्या जाणकारांचे लक्ष लागले आहे. मात्र याक्षणी अस्थायी समितीच्या आक्रमक चढाईमुळे कबड्डीतल्या बाबुरावांचे आणि त्यांच्या समर्थकांचे अक्षरशः धाबे दणाणले आहेत. संघ निवडीत वशिलेबाजी करताना अमूक जिह्यातून खेळला तर राज्य संघान स्थान मिळेल, प्रो-कबड्डीत खेळता येईल, अशा आमिषांमुळे दुसऱया जिह्यांकडून खेळणाऱया खेळाडूंबाबतही अस्थायी समितीकडून कबड्डी आणि कबड्डीपटूंच्या हिताच्या निर्णयाची अपेक्षा आहे. राज्य संघात खेळण्यासाठी सुरू झालेली वशिलेबाजी आणि त्यामुळे गुणवान खेळाडूंवर झालेला अन्याय वारंवार उघडकीस आला आहे. तो दूर करण्यासाठी अस्थायी समिती किती जोरदार चढाई करते याची सर्व कबड्डीप्रेमी, कबड्डी संघटक आणि कबड्डीपटूंना उत्सुकता लागली आहे. त्यामुळे अस्थायी समिती खरंच कबड्डीची आहे की बडी बडी बाते करणारी, ते लवकरच कळेल.
Comments are closed.