CM Devendra Fadnavis vows to make Nashik Kumbh Mela 2027 hi tech


– प्रेमानंद बच्छाव

मुंबई : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी वेगळे कुंभमेळा प्राधिकरण निर्माण करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (26 फेब्रुवारी) केली. तसेच हा सिंहस्थ कुंभ ‘डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ’ म्हणून ओळखला जावा, यासाठीचे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. 2027मध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारी संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सह्याद्री अतिथीगृहावर आढावा बैठक पार पडली. त्यावेळी त्यांनी यासंदर्भात अनेक सूचना केल्या. या बैठकीला आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह विविध विभागाचे सचिव उपस्थित होते. (CM Devendra Fadnavis vows to make Nashik Kumbh Mela 2027 hi tech)

हेही वाचा : Mahashivratri : चंद्रपूरमध्ये महाशिवरात्रीनिमित्त अंघोळीसाठी गेलेले 6 जण बुडाले 

बैठकीमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने डॉ. गेडाम यांनी सादरीकरण केले. गेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार नाशिकमधील एक पथक प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्याच्या तयारीची माहिती घेण्यास पाठवण्यात आले होते. या पथकाने नोंदवलेल्या सूचना आणि त्याअनुषंगाने सिंहस्थ कुंभमेळ्यात करायच्या सोयी सुविधांचा यावेळी आढावा घेण्यात आला. “सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन सुव्यवस्थित व्हावे, सर्व यंत्रणांचा समन्वय व्हावा. तसेच, कुंभमेळ्याची कामे गतीने व्हावीत, यासाठी कुंभमेळा प्राधिकरण तयार करावे. तसेच कुंभमेळा प्राधिकरण कायदा तयार करावा. कुंभमेळ्यासाठी लागणारे मनुष्यबळ कुंभमेळा प्राधिकरणाच्या अखत्यारित घ्यावे,” अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीत दिल्या. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी यापूर्वीच प्राथमिक आराखडा तयार केला होता. पण, प्रयागराजमधील महाकुंभसाठी झालेली गर्दीची परिस्थिती पाहता नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आणखी 4 ते 5 पट गर्दीच्या अनुषंगाने जास्तीचे नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. गर्दीचे व्यवस्थापन, घाटांची संख्या, रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीचे नियोजनही या आराखड्यात असावे. नाशिक त्र्यंबक रस्ता 24 मीटर वाढवण्यात यावा. तसेच या रस्त्यांच्या बाजूला टेंट सिटी उभारण्यासंदर्भातही विचार करावा. नाशिक शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण करावी. गोदावरी नदीच्या काठावर किनारी रस्ता तयार करता येईल का? याचा ड्रोन सर्व्हेक्षण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

रस्ते मार्गांचे बळकीटकरण

सिंहस्थसाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे मुंबई, जव्हार, गुजरात, छत्रपती संभाजीनगर, शिर्डी, धुळे, पुणे, मुंबई अशा मार्गाने भाविक येण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने त्या मार्गातील रस्त्यांचे बळकटीकरण करावे. त्या रस्त्यांवर वाहनतळांची सुविधा निर्माण करावी. कुंभ काळात नाशिक शहरात वाहने सोडण्यात येऊ नयेत. भाविकांना वाहनतळापासून शहरात प्रवासासाठी ई बसचा पर्याय उपलब्ध करून द्यावा. तसेच या ई बस प्रत्येक 3 मिनिटांना सुटतील असे नियोजन करावे. तसेच शिर्डी, छत्रपती संभाजी नगर, ओझर या विमानतळावरही प्रवाशांचे नियोजन करावे. शिर्डी विमानतळावर विमाने थांबवण्यासाठी जागा वाढवण्यात यावी. तसेच ओझर विमानतळावरही अधिक विमानांचे लँडिंगसाठी सोय उपलब्ध करून द्यावी. नाशिक शहरात हेलिपॅड उभारता येतील का याचा विचार करण्याची सूचना फडणवीस यांनी बैठकीत केली. रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून रेल्वेने येणाऱ्या भाविकांसाठी नाशिक रोड, इगतपुरी, कसारा आदी स्थानकांमध्ये सोयी सुविधा निर्माण कराव्यात, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

हेही वाचा : Swargate Rape Case : महिला प्रवाशांच्या सुरक्षेत हयगय करणाऱ्यांचे निलंबन करा, परिवहन मंत्र्यांचे निर्देश 

डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ व्हावा

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करावा. गर्दीचे नियोजन, वाहतूक नियोजन तसेच सर्व्हेलन्ससाठी जास्तीत जास्त ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करावा. ज्या भागातून जास्त गर्दी होते त्या रस्त्यांवर गर्दीच्या नियोजनासाठी आणि भाविकांना वेळ घालविता यावा, यासाठी त्या ठिकाणी डिजिटल कुंभसंदर्भातील प्रदर्शन तयार करावे. सिंहस्थ कुंभ मेळ्याच्या लोगो निर्माण करण्यासाठी स्पर्धा घ्यावी, अशी सूचना देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत केली.


Edited by Abhijeet Jadhav



Source link

Comments are closed.