केजरीवाल राज्यसभेचे सदस्य होईल का?

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल राज्यसभेत जाण्याचा विचार करीत आहेत काय, या प्रश्नावर राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. ही शक्यता पंजाब विधानसभेसाठीच्या एका पोटनिवडणुकीमुळे निर्माण झाली आहे. या राज्यातील लुधियाना पश्चिम या विधानसभा मतदारसंघात ही पोट निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाचे आपले विद्यमान राज्यसभा सदस्य संजीव अरोरा यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यसभा सदस्याला विधानसभेच्या पोटनिवडणुकीची उमेदवारी देण्याच्या आम आदमी पक्षाच्या निर्णयासंबंधी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या निर्णयामागे राज्यसभेची जागा रिक्त करण्याचा हेतू आहे काय, असा प्रश्न विचारला जात आहे. अर्थात, तसे होण्यासाठी ही विधानसभा पोटनिवडणूक अरोरा यांना जिंकावी लागणार आहे. पंजाब राज्यात आम आदमी पक्ष सत्तेवर असून या पक्षाकडे राज्यात चांगल्या उमेदवारांची कमतरता नाही. तरीही राज्यसभेच्या विद्यमान सदस्याला उमेदवारी देण्याच्या निर्णयामुळे अनेक राजकीय तज्ञांच्या भुवया उंचावल्या आहेत.

जागा रिक्त करण्याचा उद्देश काय ?

राज्यसभेतील एका खासदाराला आमदार बनवून त्याला राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावयास लावणे आणि त्या रिक्त जागी पंजाब विधानसभेतूनच केजरीवाल यांना राज्यसभेत पाठविणे, असा आम आदमी पक्षाचा उद्देश असू शकतो, असे अनेक राजकीय तज्ञांचे म्हणणे आहे. सध्या केजरीवाल कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाप्रमाणेच त्यांचा स्वत:चाही पराभव झाला आहे. ते आम आदमी पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत. असा सर्वोच्च नेता कोणत्याही लोकप्रतिनिधीगृहाचा सदस्य असू नये, ही बाब लोकांमध्ये चुकीचा संदेश धाडते. सध्याच्या स्थितीत त्यांना केवळ राज्यसभेतच संधी आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाची अशी योजना असू शकते, असे मत आहे.

आम आदमी पार्टीची माहिती

आम आदमी पक्षाने केजरीवाल यांना राज्यसभेत पाठविले जाण्याची शक्यता फेटाळली आहे. पक्षाचा असा कोणताही विचार नाही. या केवळ हेतुपुरस्सर उठविण्यात आलेल्या वावड्या आहेत. केजरीवाल हे पदासाठी हापापलेले नाहीत, असे स्पष्टीकरण आम आदमी पक्षाकडून देण्यात आले आहे. तरीही, राज्यसभा सदस्याला विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी देणे हे अनेकांना काहीसे विचित्र वाटत असल्याने स्पष्टीकरण देऊनही ही शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.