दत्तात्रय गाडे हॅबिच्युअल ऑफेंडर? स्वारगेट डेपोत पोलिसी रुबाबात तरुणींवर टाकायचा जाळं, त्या महत
<पी शैली ="मजकूर-संरेखित: न्याय्य;">पुणे: राज्यात सांस्कृतिक शहर, शिक्षणाचं माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात गेल्या अनेक दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढल्याचं चित्र आहे. अशातच पुण्यातील स्वारगेट बस स्टँड परिसरात शिवशाही बसमध्ये झालेल्या अत्याचार प्रकरणामुळे संपूर्ण राज्य हादरलं आहे. मंगळवारी पहाटे 5.30 ते 6 च्या सुमारास एका 26 वर्षांच्या तरूणीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. आरोपीने एकदा नव्हे तब्बल दोनवेळा त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला आणि तो फरार झाला असल्याची माहिती आहे. या प्रकरणातील नराधम आरोपीचं नाव दत्तात्रय गाडे असून तो शिरूर तालुक्यातील गुणाट येथील रहिवासी असल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून त्याचा फोन देखील बंद असल्याची माहिती आहे. शिरूर आणि पुणे पोलिसांची एकूण 13 पथकं आरोपीचा शोध घेत आहेत. त्याच्या भावालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. तर आरोपीच्या आई- वडीलांची तसेच त्याच्या मित्र-मैत्रिणींना देखील चौकशीसाठी देखील बोलावण्यात आलं आहे. तर या नराधम आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
तो नराधम सराईत गुन्हेगार, याआधी त्याने…
या प्रकरणातील नराधम आरोपी सराईत गुन्हेगार असल्याची माहिती आहे. तर या नराधमाने याआधी देखील महिलांना, तरूणींना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचीही माहिती असल्याची माहिती आहे. गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात दिसून आले आहे. त्याने बलात्काराच्या या घटनेव्यतिरिक्तही काही मुलींना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यासाठी तो आपण पोलिस असल्याचे भासवायचा. त्याच्या संपर्कामध्ये आलेल्या राजकीय व्यक्ती आणि पोलिस कर्मचाऱ्यांकडे चौकशी सुरू करण्यात आली आहे. दत्ता गाडेवरती आत्तापर्यंत सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांच्या शक्यतेनुसार, आरोपी दत्तात्रय गाडे सातत्याने स्वारगेट बस स्टँडवर वारंवार जात असावा. त्यामुळे त्याला परिसरातील पूर्ण माहिती होती. त्याचाच फायदा घेऊन त्याने पीडित तरुणीला एसटी स्टँडवरील निर्जनस्थळी घेऊन जाऊन बलात्कार केल्याचीशक्यता वर्तवली जात आहे. स्वारगेट एसटी स्टँडवर महिला, मुलींची छेडछाड होत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही पोलिसांकडे येत होत्या. त्या त्या वेळी गस्त घालून, संशयितांची चौकशी करून त्यांना हाकलून देण्यात येत होतं. मात्र, यावेळी ती एकटी असल्याचा आणि अंधाराचा फायदा घेत नराधम आरोपीने तिच्यावर बलात्कार केला.
गाडेच्या मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
गुन्हे शाखेने बुधवारी दत्तात्रय गाडे याच्या मित्र-मैत्रिणींची चौकशी केली. गाडे याच्या एका मैत्रिणीला भोरवरुन चौकशीसाठी पुण्यात आणण्यात आले. त्यावेळी तिने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली. दत्तात्रय गाडे मला सारखे फोन करायचा आणि मेसेज करायचा. या दोघांची आणखी एक मैत्रीण होती. तिच्याशी पॅचअप करुन दे किंवा तिची भेट घालून दे, असा धोशा दत्तात्रय गाडेने माझ्याकडे लावला होता. तो यासाठी मला सतत फोन करुन त्रास द्यायचा, असे या गाडेच्या मैत्रिणीने सांगितले. त्यामुळे दत्तात्रय गाडेने महिलेवर अत्याचार केल्याची ही पहिलीच घटना नसावी, यापूर्वीही त्याने महिलांना त्रास दिला असावा, असा संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीने पोलीस आता तपास करत आहेत. गुन्हे शाखेने बुधवारी रात्रीपर्यंत दत्तात्रय गाडे याच्या 10 मित्र-मैत्रिणींची चौकशी केली. या सगळ्यांकडून दत्तात्रय गाडे याच्याबद्दल खडानखडा माहिती पोलिसांनी काढून घेतली आहे. दत्तात्रय गाडे हा मूळचा शिरुरचा होता. पोलिसांनी शिरुरमधील त्याच्या घरी बंदोबस्त लावला आहे. याशिवाय, दत्तात्रय गाडे याच्या आई-वडिलांना आणि भावाला पोलिसांनी चौकशीसाठी पुण्यात बोलावून घेतले आहे. त्यामुळे आता दत्तात्रय गाडे पोलिसांच्या ताब्यात कधी सापडणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
नेमकं काय-काय घडलं?
पिडीत तरुणीला दत्रात्रय गाडेने जीवे मारण्याची धमकी दिल्याने ही तरुणी घाबरुन गेली. त्यामुळे स्वारगेट बस स्थानकावर आरडाओरड करण्याचे त्राणही तीच्यात उरलं नाही. 26 वर्षांची तरुणी मंगळवारी पहाटे स्वारगेट बस स्थानकात आली. तीला फलटणला जायचे होते. त्यावेळी स्वारगेट परिसरात सराईत गुन्हेगार असलेला दत्तात्रय गाडे सावज हेरण्याचा प्रयत्न करत होता. 26 वर्षांची ही मुलगी एकटी आहे हे पाहून गाडेने तीला आगारात मधोमध उभी असलेली एस टी फलटणला जाणार आहे असं सांगितलं. सोलापुरहून स्वारगेटला उभी असलेली ही बस पुन्हा सोलापुरला जाणार असून वाटेत ती फलटणला थांबेल असं त्याने पिडीतेला सांगितलं. हे सगळं सांगताना तो पिडीतेला ताई – ताई असे म्हणत होता. त्याच्यावर विश्वास ठेऊन ही तरुणी बसमधे चढली. तीच्या पाठोपाठ दत्तात्रय गाडे देखील बसमधे चढला आणि त्याने तीच्यावर बलात्कार केला. त्यानंतर याची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी त्याने या तरुणीला दिली. त्यामूळे घाबरुन जाऊन ही तरुणी तीच्यासोबत घडलेला प्रकार कोणाला सांगु शकली नाही. त्यानंतर ती दुसऱ्या बसने फलटणला जायला निघाली. वाटेत असताना तीने हा प्रकार तीच्या घरच्यांना सांगितला. त्यानंतर पोलीसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली.
Comments are closed.