प्रयागराजचा महाकुंभ पूर्ण होताच मुख्यमंत्री फडणवीसांची पोस्ट; नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भात केलं मोठं विधान

महाशिवरात्रीच्या उत्सवासोबत बुधवारी उत्तर प्रदेशातील महाकुंभ सोहळ्याची पूर्णाहुती झाली. शेवटच्या दिवशी सुमारे दीड कोटीहून अधिक भाविकांनी अमृतस्नानाचा लाभ घेतल्याची माहिती उत्तर प्रदेशमधील प्रशासनाने दिली आहे. तर 45 दिवसांच्या महाकुंभमेळ्यात 66 कोटी लोकांनी पवित्रस्नान केल्याचे सांगण्यात येत आहे. यंदाचा महाकुंभमेळा विविध कारणांनी जगभरात चर्चेचा विषय ठरला. आता सगळ्यांचं लक्षं लागलं आहे ते नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याकडे.
नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा 2027 मध्ये होणार आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयागराज मधील महाकुंभाची पूर्णाहुती होताच सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. आपल्या पोस्टमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी दावा केला आहे की, नाशिकचा ‘सिंहस्थ कुंभ मेळा 2027’ देखील अविस्मरणीय असेल.
आपल्या हँडलवर फडणवीसांनी हिंदी भाषेत पोस्ट केली आहे. ‘प्रयागराज के महाकुंभ की पूर्णाहुति!
नासिक का ‘सिंहस्थ कुंभ मेला 2027′ भी होगा अविस्मरणीय!’, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
पुढे ते म्हणातात, ‘प्रयागराज येथील सनातनी श्रद्धेचा महान उत्सव ‘महाकुंभ 2025′ ने जगभरात हिंदुस्थानी संस्कृतीचा झेंडा फडकवत जागतिक स्तरावर कीर्ति उंचावली आहे. यामुळे आम्हा सर्वांमध्ये नवा उत्साह संचारला आहे. आपल्या या वैभवशाली परंपरेचा दिव्य अनुभव घेण्यासाठी 2027 साली महाराष्ट्रातील नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यात आपण पुन्हा एकदा एकत्र येऊ…’
दरम्यान, नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे सन 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ पुंभमेळ्यासाठी वेगळे कुंभमेळा प्राधिकरण निर्माण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिले. हा सिंहस्थ कुंभ ‘डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ’ म्हणून ओळखला जावा यासाठीचे नियोजन करण्याच्या सूचनाही दिल्या.
Comments are closed.