भिवंडीत 71 लाखांचा मालमत्ता कर लटकवणाऱ्या इमारतीचे पाणी तोडले, वसुलीत कुचराई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही बडगा

थकीत मालमत्ता कराच्या बोजामुळे भिवंडी महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे. यामुळे नवनियुक्त आयुक्त अनमोल सागर यांनी करवसुलीसाठी अधिकारी वर्गाला डेडलाइन दिली आहे. कर चुकवणाऱ्या मालमत्तांवर धडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. यानुसार आज निजामपूर नदीनाका परिसरातील 71 लाख रुपये कर थकवणाऱ्या एका सात मजली इमारतीचे पाणी तोडण्यात आले. याशिवाय कामात कुचराई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
आर्थिक वर्ष संपायला एक महिना राहिला तरी अजूनही 50 टक्क्यांपेक्षा अधिक करवसुली बाकी आहे. आयुक्त अनमोल सागर यांनी थकीत मालमत्ता करवसुलीसाठी कठोर कारवाईचे निर्देश दिल्यानंतर प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे. निजामपूर नदीनाका या परिसरात फरीद बाग या ठिकाणी सात मजली इमारतीतील रहिवाशांनी 71 लाख रुपये कर थकवला होता. वारंवार नोटीस देऊनही रहिवासी दाद देत नसल्याने प्रभाग क्रमांक एकचे सहाय्यक आयुक्त राजू वरळीकर, कर विभागाचे उपायुक्त बाळकृष्ण क्षीरसागर यांच्या पथकाने इमारतीचा पाणीपुरवठा खंडित केला.
Comments are closed.