झटपट श्रीमंतीसाठी त्यांनी चोरल्या 11 रिक्षा, दोघांना अटक; सहा गुन्ह्यांची उकल

झटपट पैसे कमावण्यासाठी रिक्षांची चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना अटक करण्यात भिवंडी पोलिसांना यश मिळाले आहे. अरबाज शहा, आरिफ खान अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी सहा गुन्ह्यांची उकल करत 11 रिक्षा जप्त केल्या आहेत. त्यांचा साथीदार सोहेल उर्फ साहिल शहा हा अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
अनोळखी चोरट्याने रिक्षा चोरल्याची तक्रार शांतीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात गुन्हे शाखेने समांतर तपास करत सीसीटीव्हीच्या मदतीने थेट धुळे गाठले. तेथे शोध घेतला असता अरबाज आणि सोहेल यांची ओळख पटली. दरम्यान अरबाज हा पुन्हा चोरीच्या उद्देशाने भिवंडीत येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळताच त्यांनी सापळा रचत त्याच्या मुसक्या आवळल्या. अरबाज हा चोरलेल्या रिक्षा भिवंडीतील बिलालनगर परिसरात राहणाऱ्या आरिफ खान याला विकत असल्याचे निष्पन्न होताच पोलिसांनी आरिफच्या देखील मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून 10 लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनावणे यांनी दिली.
महिलेची चेन लांबवली
पादचारी महिलेच्या गळ्यातून चोरट्याने चेन लांबवल्याची घटना समोर आली आहे. सुमन जुगार (64) असे पादचारी महिलेचे नाव आहे. सुमन या कामानिमित्त घरातून बाहेर पडल्या होत्या. त्या रस्त्याने चालत असताना मागून दुचाकीने आलेल्या चोरट्यांनी गळ्यातील दोन सोन्याच्या चेन हिसकावून पोबारा केला.
कारखान्यात चोरी
आसबीवी रोड येथील कंपाऊंड परिसरात असलेल्या कारखान्यात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. अभिषेक जैन यांच्या मालकीचा हा यंत्रमाग कारखाना आहे. हा कारखाना बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी भिंतीला छिद्र पाडून कारखान्यातील 1 लाख 24 हजार 200 रुपये किमतीचे इलेक्ट्रिक मोटार, 30 फणी, 1 पितळी घडी, 10 सेट जाळी व 40 लोखंडी यंत्रमागचे साहित्य लांबवले आहे.
Comments are closed.