कोल्हापूर-बेळगाव एसटी सेवा आजपासून पुन्हा सुरू होणार

कन्नड भाषा बोलता येत नसल्याच्या क्षुल्लक कारणावरून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीचालक आणि वाहकाला धक्काबुक्की करून तोंडाला काळे फासल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. त्यानंतर गेल्या पाच दिवसांपासून बंद असलेली कोल्हापूर-बेळगाव एसटी बससेवा उद्यापासून (दि. 27) पुन्हा सुरू होत आहे. कोल्हापूर आणि बेळगावचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
कर्नाटक सीमाभागातील चित्रदुर्ग येथून 21 फेब्रुवारी रोजी प्रवासी घेऊन कोल्हापूरकडे निघालेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या एसटी चालकास कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंडांनी रात्री उशिरा अडविले. कन्नड भाषा येत नाही म्हटल्यावर धक्काबुक्की करत तोंडाला काळे फासले. तसेच एसटीलाही काळे फासण्यात आले होते. या घटनेचे संतप्त पडसाद दुसऱ्या दिवशी कोल्हापुरात उमटले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने कर्नाटक सरकारविरोधात जोरदार निदर्शने करत, कर्नाटक परिवहन मंडळाच्या बसवर भगवा झेंडा फडकवला. त्यामुळे वातावरण अधिक चिघळू नये, तसेच एसटी बसचे नुकसान होऊ नये, यासाठी दोन्ही बाजूंकडून बस वाहतूक बंद करण्यात आली होती.
महाराष्ट्र शासनाने 22 फेब्रुवारीपासून वाहक चालक तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कर्नाटकातील प्रवासी वाहतूक बंद केली होती. जोपर्यंत परिस्थिती निवळत नाही तोपर्यंत वाहतूक चालू करण्यात येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला होता. केवळ सीमाभागाच्या अलीकडेच ही बस वाहतूक सुरू असल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता. शिवाय खासगी वाहनधारकांचा प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता. यामुळे कोल्हापूर आगारास साधारणतः 12 लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला.
दरम्यान, व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे दोन्ही जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर ही वाहतूक पूर्ववत चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला. बससेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी दोन्ही जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांनी सीमाभागात दोन्ही बाजूस पोलीस सुरक्षा देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे उद्या (दि. 27) ही बससेवा पूर्ववत सुरू होत असल्याचे बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशनी यांनी सांगितले.
बेळगाव आगाराच्या वाहतूक नियंत्रक सुशीला कोटगी म्हणाल्या, कर्नाटक ते महाराष्ट्र बससेवा चालू नसल्याने प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. बसेस केवळ दोन्ही राज्यांच्या सीमेवर जाऊन परत येत आहेत. आज बेळगावहून संकेश्वर, निपाणीपर्यंत 64 फेऱ्या झाल्या आहेत. प्रवाशांना महाराष्ट्र सीमेवर उतरून अन्य वाहनांची सोय करून त्यांच्या घरी जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
Comments are closed.