ब्रह्मपुत्र नदीवर एक विशाल धरण बांधले जाईल.

चीनच्या चालीला भारताची प्रत्युत्तर देण्यास सज्जता

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

तिबेटमधून वाहणाऱ्या ब्रम्हपुत्रा नदीवर जगातील सर्वात मोठे धरण बांधण्याची चीनची योजना असून शनिवारपासून चीनने या निर्माण कार्याला प्रारंभ केला आहे. या धरणाचे निर्माणकार्य पूर्ण झाल्यावर चीन ब्रम्हपुत्रेतून भारतात येणारे पाणी नियंत्रित करु शकेल, अशी चिंता काही जणांनी व्यक्त केली आहे. तथापि, भारताने ही चिंता व्यर्थ असल्याचा प्रतिवाद केला आहे. तसेच, चीनने धरण बांधल्यास अरुणाचल प्रदेशच्या उत्तर सीमेवर असेच मोठे धरण बांधण्याची योजना भारताच्याही विचाराधीन आहे. त्यामुळे चीनला प्रत्युत्तर दिले जाऊ शकते.

या धरण प्रकल्पाला चीनच्या प्रशासनाने गेल्या डिसेंबरमध्ये मान्यता दिली होती. त्यानंतर सहा महिन्यांनी आता प्रत्यक्ष बांधकामाला प्रारंभ करण्यात आला आहे. हे धरण येत्या सहा ते सात वर्षांमध्ये पूर्ण करण्याची चीनची योजना आहे. तिबेटमध्ये ब्रम्हपुत्रा नदीला यारलंग त्सांगपो असे संबोधले जाते. या धरणातून मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती करण्याची चीनची योजना आहे. या धरणाचा उपयोग पाणी आडविण्यासाठी नव्हे, तर केवळ वीज निर्माण करण्यासाठी केला जाईल, असे चीनचे म्हणणे आहे. तथापि, या धरणाचा उपयोग चीन एक युद्धनीतीप्रमाणेही भविष्यात करु शकतो, अशी शक्यता काही तज्ञांनी बोलून दाखविली आहे.

भारताची प्रतियोजना

चीनने हे धरण बांधले तरी तो भारतात या नदीतून येणारे पाणी फारसे आडवू शकणार नाही. कारण ब्रम्हपुत्रा नदीत भारतातच सर्वाधिक पाणी संकलित होते. या नदीला मिळणाऱ्या उपनद्या भारतातच सर्वाधिक आहेत. त्या मान्सूनच्या पावसाचे पाणी या नदीत आणतात. त्यामुळे भारतात प्रवेश केल्यानंतरच ही नदी मोठ्या प्रमाणात विस्तारते. परिणामी चीनच्या धरणाचा या नदीच्या भारतातील पाण्यावर फारसा परिणाम होणार नाही. तसेच भारतानेही अरुणाचल प्रदेशच्या उत्तर सीमेच्या आत असेच मोठे धरण बांधण्याच्या योजनेवर विचार चालविला आहे. भारताने हे धरण बांधल्यास तिबेटमधून वाहणाऱ्या ब्रम्हपुत्रेच्या पाण्याचा वेग कमी होणार आहे. त्यामुळे चीनच्या वीजनिर्मितीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, असेही काही तज्ञांचे मत आहे. परिणामी, भारत चीनला त्याच्याच भाषेत प्रत्युत्तर देऊ शकतो, अशी स्थिती असल्याचे दिसून येते. आगामी काही वर्षांमध्ये या संबंधातील स्थिती अधिक स्पष्ट होणार आहे. चीनने आतापर्यंत तिबेटमधील ब्रम्हपुत्रेवर दोन मोठी धरणे बांधली आहेत. तथापि, भारतातील ब्रम्हपुत्रेच्या पाण्यावर या धरणांचा विशेष परिणाम होऊ शकल्याचे आजवर दिसून आलेले नाही. त्यामुळे चीनच्या या प्रकल्पाचा भारतावर विशेष परिणाम होणार नाही, असेही मत मांडले जात आहे.

Comments are closed.