टीम इंडिया अडचणीत! दोन वेगवान गोलंदाज आधीच दुखापतीमुळे बाहेर, आता बुमराहबद्दलही मोठी अपडेट समोर

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील चौथा सामना (IND vs ENG 4th Test) 23 जुलैपासून मँचेस्टरमध्ये खेळवला जाणार आहे. पण त्याआधीच टीम इंडिया (Team india) अडचणीत सापडताना दिसत आहे.
अर्शदीप सिंग (Arshdeep singh) आधीच दुखापतीमुळे बाहेर आहे आणि आता आकाशदीपलाही (Aakash Deep) फिटनेससंबंधी त्रास जाणवू लागला आहे. आकाशदीपने बर्मिंगहॅम कसोटी सामन्यात एकूण 10 विकेट्स घेतल्या होत्या, पण आता त्याच्या पाठीला त्रास होत आहे. हे पहिल्यांदाच नाही, लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या डावातही तो पाठीच्या वेदनांनी त्रस्त दिसला होता.

टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, अर्शदीप आणि आकाशदीप यांच्या जागी अंशुल कंबोजला संघात स्थान देण्यात आलं आहे. तसंच हेही स्पष्ट केलं गेलं आहे की जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) मँचेस्टरमध्ये खेळणार आहे. मालिकेच्या सुरुवातीला ठरवण्यात आलं होतं की बुमराह 3 कसोटी सामने खेळेल, त्यामुळे बहुधा तो शेवटचा सामना द ओव्हलवर खेळणार नाही.

त्या रिपोर्टमध्ये असंही सांगितलं आहे की, उर्वरित दोन सामन्यांमध्ये बुमराह आणि आकाशदीप दोघेही एकत्र मैदानात उतरणार नाहीत. म्हणजे बुमराह मँचेस्टरमध्ये खेळला, तर द ओव्हलवरील शेवटच्या टेस्टमध्ये आकाशदीप बुमराहच्या जागी खेळेल. हे पाहता भारताचा वेगवान गोलंदाजी पेस अटॅक काहीसा कमकुवत होताना दिसत आहे. त्यामुळे टीम इंडिया चांगलीच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

आकाशदीप आणि अर्शदीप दुखापतीमुळे बाहेर पडल्याने टीम इंडियाला (Team india) नेट प्रॅक्टिसदरम्यानही अडचणी आल्या. त्याचबरोबर, गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्कललाही गोलंदाजी करताना पाहण्यात आलं.

दुसरीकडे, अंशुल कंबोजला (Anshul Kamboj) प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळते का हे पाहणं रंजक ठरेल, कारण त्याला अद्याप एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याचा अनुभव नाही. आकाशदीपबाबत बोलायचे झाल्यास, तर त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही पाठीच्या दुखण्याचा त्रास झाला होता.

सध्या तीन सामन्यांनंतर इंग्लंड ह्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. उर्वरित दोन सामने ओल्ड ट्रॅफर्ड मँचेस्टर आणि द ओव्हल मैदानावर खेळले जाणार आहेत. भारताला ही मालिका जिंकण्यासाठी मँचेस्टरमधील सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे.

Comments are closed.