राजेंविरुद्ध शड्डू, अभिजीत बिचुकलेंचा नगराध्यक्षपदासाठी अर्ज; म्हणाले, साताऱ्याचा ‘सितारा’ करतो
सातारा: बिहार विधानसभेचा निकाल आज जाहीर झाला असून भाजप एनडीए आघाडीला मोठं यश मिळालं आहे. भाजपकडून महाराष्ट्रातही या विजयाचं सेलिब्रेशन सुरू असून आता राज्यातील नगरपालिका, महापालिका निवडणुकांची (Election) तयारी सुरु झाली आहे. एकीकडे या निवडणूक निकालाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे राज्यातील 246 नगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरणे सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले (Abhijit bichukale) यांनी सातारा (Satara) नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यापूर्वी राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा आणि विधानसभा रेसमध्ये धावणारे साताऱ्याचे कवी मनाचे नेते बिग अभिजीत बिचुकले आता नगरपालिका निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यासाठीच, सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचा अर्ज त्यांनी दाखल केला.
नगरपालिकेची रणधुमाळी सुरू असून अर्ज भरण्याची मुदत अवघे काही दिवस उरली आहे. साताऱ्यात नगराध्यक्ष पदासाठी अभिजीत बिचुकले यांनी नामनिर्देशन पत्र भरून भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे. नगरपालिका ही माझी मातृ संस्था आहे, मी माझी सौभाग्यवती अलंकृता बिचुकले यांचा प्रचार करत होतो म्हणून काही लोकांनी त्यांच्या स्वार्थासाठी हारामगिरी करून मला कामावरून काढलं, एवढा मोठा अन्याय माझ्यावर झाला आहे. सातारा नगरपालिकेतील सगळी अल्ली-पिल्ली बाहेर काढायची आहेत, साताऱ्यातील खड्डे आणि बागांची दुरावस्था मी बघत आहे. गेल्या 25 वर्षे नगरपालिकेत काम करत असताना आणि लोकसभा विधानसभा निवडणूक लढत असताना आपलं प्रेम मिळालं, असे बिचुकले यांनी म्हटलं. दरम्यान, माझ्या पदरात नगराध्यक्षपद टाका तुमच्या साताऱ्याचा सितारा करून टाकतो, असेही अभिजीत बिचुकले यांनी म्हटलं.
उदयनराजे अन् शिवेंद्रराजेंचा उमेदवार कोण? (Udayanraje bhosale satara)
दरम्यान, सातारा नगरपालिकेच्या इच्छुक उमेदवारांच्या उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्या आघाडीच्यावतीने मुलाखती पार पडल्या आहेत. त्यामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीचे इच्छुक उमेदवार आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या नगरविकास आघाडीचे इच्छुक उमेदवारांनी एकत्र मुलाखती दिल्या. यादरम्यान शिवेंद्रराजे भोसले यांनी आमच्या दोघांचे मनोमिलन कायम असल्याचे सांगत कमळ चिन्हावर ही नगरपालिका निवडणूक लढवली जाणार असल्याचेही स्पष्ट केले. मात्र, नगराध्यक्ष पदासाठी उदयनराजे आणि शिवेंद्रराजे या दोघांची बैठक पार पडली, त्यामध्ये नगराध्यक्ष कोणत्या आघाडीचा असावा याबाबत अजून शिक्कामोर्तब झालेलं नाही. दरम्यान, यावेळी खासदार उदयनराजे यांना विचारले असता त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी मी स्वतःच इच्छुक असल्याची मिश्कील टिप्पणी करत या प्रश्नाला बगलही दिली होती. मात्र, अद्यापही या आघाडीकडून नगराध्यक्षपदाचा उमेदवार ठरलेला नाही.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.