IND vs ENG: चौथ्या कसोटीत टीम इंडियाने तीन फिरकीपटूंना खेळवावं, इंग्लंडच्या ‘या’ दिग्गजाने दिला विजयाचा फॉर्म्युला

भारतीय संघ (Indian cricket team) सध्या इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. 23 जुलैपासून मँचेस्टरच्या मैदानावर चौथा कसोटी सामना होणार आहे. भारताला ही मालिका जिंकण्यासाठी या सामन्यात विजय मिळवणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरीकडे, इंग्लंडही हा सामना जिंकून मालिका आपल्या नावे करायचा प्रयत्न करणार आहे. या सामन्यापूर्वी इंग्लंडचे माजी कर्णधार मायकेल ॲथरटन (Micheal Atherton) यांनी भारतीय संघाला विजयाचा फॉर्म्युला सुचवला आहे. त्यांच्या मते, भारताने या सामन्यात 3 फिरकी गोलंदाजांना संधी द्यावी.

मायकेल एथरटन (Micheal Atherton) यांचं मत आहे की, मँचेस्टरमधील खेळपट्टीवर 3 फिरकीपटूंना खेळवणं भारतासाठी फायदेशीर ठरेल. टीम इंडियाने प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल करणं गरजेचं आहे. त्यांनी सांगितलं की, मी जेव्हा टेलिव्हिजनवर मँचेस्टरची खेळपट्टी पाहिली, तेव्हा ती सपाट वाटत होती. ओल्ड ट्रॅफर्डसारख्या मैदानांवर कलाई फिरकी (wrist spin) अधिक प्रभावी ठरते. त्यामुळे भारत बुमराह आणि सिराज यांच्यासोबत वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव या तीन स्पिनर्सना खेळवू शकतो का, याचा विचार करावा.

ॲथरटन यांनी पुढे सांगितलं की, या सामन्यात हवामानही महत्त्वाची भूमिका बजावेल. मँचेस्टरचं हवामान बदलत असतं. जर तिथे हवामान थंड आणि पावसाळी असेल, तर वेगवान गोलंदाज प्रभावी ठरतील. मात्र तरीही भारताने तीन फिरकीपटू खेळवण्याचा पर्याय नक्कीच विचारात घ्यावा, असं त्यांचं मत आहे.

याआधी झालेल्या लॉर्ड्स कसोटी सामन्यात भारताला 22 धावांनी पराभव स्विकारावा लागला होता. भारताला दुसऱ्या डावात 193 धावांचं लक्ष्य होतं, पण संपूर्ण संघ 170 धावांवर ऑल आऊट झाला आणि इंग्लंडने सामना 22 धावांनी जिंकला.

Comments are closed.