शिर्डी नगरपरिषदेत भाजपविरोधात भाजपचे बंड, निवडणुकीत नवा ट्विस्ट

राज्याचे जलसंधारणमंत्री व अहिल्यानगर जिह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या शिर्डी मतदारसंघामध्ये भाजपने स्वतंत्र गट तयार करून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे जिह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

शिर्डी नगरपरिषद निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत रंगण्याची चिन्हे असतानाच भाजपमध्येच अंतर्गत बंडाचे वारे वाहू लागले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व 1980 साली शिर्डीत आरएसएसची पहिली शाखा उभी करणारे बाबूजी पुरोहित यांनी भाजपच्या अधिकृत पॅनेलविरोधात स्वतंत्र पॅनेल उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.

जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या पॅनेलविरोधात उभे ठाकत पुरोहित यांनी थेट आव्हान दिल्याने भाजपमध्ये चिंता वाढली आहे. पुरोहित यांच्यासोबत संघाचे व भाजपचे जुने, निष्ठावंत कार्यकर्ते मोठय़ा प्रमाणावर एकवटत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये पुरोहित यांचे पुत्र आणि संघ प्रचारक विराट पुरोहित हे सक्रिय भूमिका बजावत आहेत.

स्थानिक बाजारपेठ उद्ध्वस्त होऊन सामान्य नागरिकांवर बेरोजगारीची वेळ आली असल्याचा आरोप करीत पुरोहित यांनी सध्याच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली. ‘येथून निवडून जाणाऱ्यांना शिर्डी गावाची काळजी नाही. शिर्डीची घडी पुन्हा बसविण्यासाठी निष्ठावंतांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहोत,’ असे बाबूजी पुरोहित यांनी सांगितले. पुरोहित पिता–पुत्रांनी निवडणुकीचा शंखनाद केल्याने जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अहिल्यानगर जिह्यामध्ये विखे विरुद्ध जुना भाजप असा संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून आहे. आता थेट निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून किंवा स्वतंत्र आघाडी तयार करून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला गेला आहे. भाजपमधील निष्ठावंतांनी एकत्र येऊन नवीन दबावगट निर्माण करणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले होते. त्यानुसार शिर्डी येथे विखेंविरोधात नवीन भाजपचा नवीन गट स्थापन झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे आगामी काळात अहिल्यानगर जिह्यामध्ये भाजपमध्ये मोठय़ा प्रमाणात अंतर्गत बंडाळी माजणार असल्याचे दिसत आहे.

Comments are closed.