नवीन वर्षी साताऱ्यात होणार साहित्याचा जागर, 99 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

सातारा येथे होत असलेल्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ लेखिका आणि विचारवंत डॉ. मृदुला गर्ग यांच्या हस्ते होणार असून, समारोप ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ लेखक रघुवीर चौधरी यांची प्रमुख उपस्थिती असेल, अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा आणि मावळा फाऊंडेशनतर्फे दि. 1 ते 4 जानेवारी या काळात प्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेला प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी उपस्थित होते.

1 जानेवारीला दुपारी 3 वाजता अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण, तर ग्रंथदिंडीसह ग्रंथ प्रदर्शन, कवीकट्टा आणि गझलकट्टा यांचेही उद्घाटन होणार आहे. यावेळी साताऱ्यातील ज्येष्ठ साहित्यिकांचा सन्मान संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते संमेलनाच्या पूर्वसंध्येला होईल. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या 750 व्या जन्मोत्सवानिमित्त आणि जगद्गुरू संत तुकोबाराय यांच्या 375 व्या वैकुंठगमन वर्षानिमित्त संत साहित्याला अभिवादन करण्यासाठी ‘बहुरूपी भारुड’ हा कार्यक्रम डॉ. भावार्थ देखणे आणि त्यांचे सहकारी सादर करतील. दि. 2 जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता संमेलनाचे उद्घाटन मृदुला गर्ग यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील, मावळत्या संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाषा मंत्री उदय सामंत, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, ज्येष्ठ उद्योजक फरोख कुपर, सार्वजनिक बांधकाममंत्री व स्वागताध्यक्ष शिवेंद्रराजे भोसले, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले उपस्थित राहणार आहेत. याच दिवशी पहिले कविसंमेलन रंगणार असून, रात्री साडेआठ वाजता प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांचा ‘शिकायला गेलो एक’ या नाटकाचा प्रयोग होईल.

‘जागतिक प्रकाशन व्यवहारात मराठी प्रकाशन व्यवहार कुठे आहे?, या विषयावर परिसंवाद, ‘मराठी कोषवाङ्मय आणि विस्ताराच्या दिशा’ या विषयावर चर्चा, कथाकथन, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांची मुलाखत, ज्येष्ठ लेखक प्रकाशक सन्मान कार्यक्रमात साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ लेखक ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड, तसेच सुविद्या प्रकाशनाचे बाबूराव मैंदर्गीकर यांचा सत्कार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. समकालीन पुस्तकांवर चर्चात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, यात अमोल पालेकर लिखित ‘ऐवज ः एक स्मृतिबंध’ या पुस्तकावर संवादात्मक कार्यक्रम होणार आहे. त्यात अमोल पालेकर यांच्यासह संध्या गोखले आण वृंदा भार्गवे सहभागी होणार आहेत. ‘आजच्या मराठी समाजाची विचारभ्रष्टता आणि वैचारिक साहित्याची निर्मिती’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. विनय हर्डीकर, प्रमोद काळबांडे, शाळीग्राम निकम, डॉ. संभाजी पाटील, ऍड. धनंजय वंजारी, हेरंब कुलकर्णी, यशवंत पाटणे आदी मान्यवर सहभागी होणार आहेत. रात्री 9 वाजता महाराष्ट्राची हास्यजत्रा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

4 जानेवारीला दुपारी साडेचार वाजता 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सांगता होणार असून, याप्रसंगी ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ लेखक रघुवीर चौधरी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, पालकमंत्री शंभुराज देसाई, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, ज्येष्ठ उद्योजक फरोख कुपर यांची उपस्थिती असेल.

संमेलनाची ठळक वैशिष्टय़े

  • संमेलनाच्या पूर्वसंध्येला आकर्षक चित्ररथांसह ग्रंथदिंडी
  • पुस्तक दालनातूनच संमेलनस्थळी जाणारा मार्ग
  • ग्रंथ प्रदर्शनाचा वाचकांना 4 दिवस घेता येणार लाभ
  • शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा लक्षणीय सहभाग
  • संमेलनाच्या पूर्वसंध्येला जिह्यातील ज्येष्ठ साहित्यिकांचा विशेष सन्मान
  • संमेलनाचे पूर्वाध्यक्ष व महामंडळाचे माजी अध्यक्ष यांना निमंत्रण
  • सरस्वती सन्मानप्राप्त साहित्यिकांनाही निमंत्रण
  • साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त बालसाहित्यकारांशी विद्यार्थ्यांचा संवाद
  • कवी आणि गझलकारांसाठी कविकट्टा
  • संमेलनात प्रथमच समकालीन पुस्तकांवर चर्चा
  • मान्यवर लेखकांच्या मुलाखती
  • चाकोरीबाहेरील विषयांवर परिसंवाद
  • 99 विद्यार्थी उद्घाटन सोहळ्यात एका सुरात गाणार ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ हे साने गुरुजींचे गीत.
  • ‘अटकेपार’ या स्मरणिकेतून उलगडणार सातारा जिह्यातील वैविध्य

Comments are closed.