आधी पहिल्याच षटकांत 2 विकेट्स, मग शिवम दुबेच्याही आधी मैदानात उतरला, 66 धावांची वादळी खेळी, अर्
अर्जुन तेंडुलकर T20 मुंबई लीग : वानखेडे स्टेडियमवर सोमवारी पार पडलेल्या टी-20 मुंबई लीग 2026 मधील रोमांचक सामन्यात ‘आर्क्स अंधेरी’ संघाने ‘वांद्रे ब्लास्टर्स’ विरुद्ध 9 गडी राखून एकतर्फी आणि दणदणीत विजय नोंदवला. आर्क्स अंधेरीच्या या विजयाचा खरा शिल्पकार स्टार अष्टपैलू खेळाडू अर्जुन तेंडुलकर ठरला. अर्जुनने प्रथम गोलंदाजीत आणि नंतर फलंदाजीतही उत्कृष्ट चमक दाखवत संघाला मोलाचे योगदान दिले. त्याला युवा फलंदाज मुशीर खानची उत्तम साथ लाभली.
अर्जुनचा गोलंदाजीत भेदक मारा
सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या वांद्रे ब्लास्टर्स संघाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. आर्क्स अंधेरीच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत वांद्रेच्या फलंदाजांना जखडून ठेवले. यात अर्जुन तेंडुलकरने सर्वाधिक प्रभावी कामगिरी केली. अर्जुनने 3 षटकांत अवघ्या 11 धावा देत 3 महत्त्वपूर्ण बळी घेतले. विशेष म्हणजे यात त्याने एक षटक निर्धाव (Maiden Over) टाकले. अर्जुनच्या या भेदक माऱ्यामुळे वांद्रे ब्लास्टर्सचा संघ निर्धारित 20 षटकांत 9 बाद 144 धावांपर्यंतच मजल मारू शकला.
तेंडुलकर आणि मुशीरची शतकी भागीदारी
वांद्रे ब्लास्टर्सने दिलेले 145 धावांचे आव्हान पार करताना आर्क्स अंधेरीची सुरुवात काहीशी खराब झाली. सलामीवीर दिव्यांश सक्सेना 26 धावा करून स्वस्तात बाद झाला. मात्र, त्यानंतर मैदानात आलेल्या मुशीर खानने अर्जुन तेंडुलकरच्या साथीने डावाची सूत्रे हाती घेतली. या जोडीने वांद्रेच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत मैदानाभोवती चौफेर फटकेबाजी केली. अर्जुन आणि मुशीर यांनी दुसऱ्या विकेट्साठी 116 धावांची नाबाद आणि मॅचविनिंग भागीदारी रचली. अर्जुन तेंडुलकरने अवघ्या 34 चेंडूंमध्ये 66 धावांची धडाकेबाज खेळी केली, तर मुशीर खानने 38 चेंडूंत 54 धावा फटकावून त्याला तोडीस तोड साथ दिली. दोन्ही फलंदाजांनी आपापली अर्धशतके पूर्ण करत संघाचा विजय सुकर केला.
या वादळी फलंदाजीच्या जोरावर आर्क्स अंधेरीने अवघ्या 13.5 षटकांत (37 चेंडू शिल्लक ठेवून) 1 बाद 145 धावा करत लक्षाचा यशस्वी पाठलाग केला. या मोठ्या विजयासह आर्क्स अंधेरीने स्पर्धेत आपले वर्चस्व सिद्ध केले असून, अर्जुन तेंडुलकर या सामन्याचा हिरो ठरला आहे.
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला
Comments are closed.