‘वस्त्रहरणकारां’ची एक्झिट
>> अरुण नलावडे
अखिल भारतीय नाटय़ संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या निधनाने मराठी नाटय़सृष्टीने एक चतुरस्र रंगकर्मी गमावला आहे. ‘वस्त्रहरण’ या नाटकाच्या माध्यमातून मालवणी भाषेला जगभरामध्ये ओळख मिळवून देणाऱया, आपल्या लेखणीतून अजरामर कलाकृती घडवणाऱया गवाणकरांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय करून देत आहेत ज्येष्ठ नाटय़ अभिनेते अरुण नलावडे.
ज्येष्ठ रंगकर्मी आणि अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलेले प्रख्यात नाटककार गंगाराम गवाणकरांचे निधन तमाम मराठी नाटय़ रसिकांना, साहित्यप्रेमींना चटका लावून जाणारे आहे. नाटकाशी घट्ट नाळ जुळलेल्या, अत्यंत सुस्वभावी, मृदुभाषी म्हणून त्यांची सर्वांना ओळख होती. गंगाराम गवाणकर हा सतत नाटक करत राहणारा माणूस होता. त्यांनी आतापर्यंत जे काही लिहिले ते अत्यंत प्रामाणिकपणे लिहिले. स्वतःच्या मातृभाषेवर अत्यंत जीव असलेला, मालवणी भाषेवर मनापासून प्रेम करणारा हा नाटककार होता.
गवाणकर 1972 पासून आकाशवाणी व दूरदर्शनवर अनेक सदरांतून, दूरदर्शन मालिका आणि मराठी चित्रपटांचे लेखन करत होते. अनेकांना त्यांचा भूतकाळ ठाऊक नसेल. अत्यंत हालअपेष्टांतून जात त्यांनी यशस्वी वाटचाल केली. लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये नाटकाची ऊर्मी होती. आर्थिक परिस्थिती जेमतेम असतानाही त्यांचे नाटकवेड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. त्यामुळे तशा परिस्थितीतही ते नाटक पाहायचे, करायचे. परिस्थितीची सबब त्यांनी कधीच पुढे केली नाही. त्यांनी सतत नाटकाशी आपली नाळ जोडलेली ठेवली. त्यांची विनोदबुद्धी आणि लेखणी तशीच शाबूत होती. त्यांचा मालवणी भाषेतील मिश्कीलपणा गोजिरवाणा होता. मालवणी भाषेला राज्यमान्यता मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. ‘वस्त्रहरण’ या नाटकाच्या प्रयोगांचे 4,500 प्रयोग करून त्यांनी विश्वविक्रम केला. या नाटकाचे 5000 हून अधिक प्रयोग झाले.
‘वस्त्रहरण’ने त्यांना जगभर ओळख मिळवून दिली असली तरी ते करतानाही त्यांना खूप अडचणींना सामोरे जावे लागले. अनंत अडचणी, संकटे भेदून त्यांनी हे नाटक साकारलेच. कोकणातील दशावतार कशा पद्धतीने होतो, हे अनेकांनी पाहिलेलं आहे. ‘वस्त्रहरण’मध्ये विनोदी अंगाने दशावताराची रंगकथा सांगतानाच दशावतारी कलावंतांची शोकांतिका त्यांनी इतक्या प्रभावीपणे मांडली की ते नाटक पाहताना कोणताही प्रेक्षक भारावून जातो. त्यांच्या नाटकातील व्यक्तिरेखा या खूप जिवंत असत. जे बघितलंय, जे भोगलंय यातून त्या आलेल्या असल्यामुळे त्या खऱया वाटत. ‘वस्त्रहरण’मधल्या व्यक्तिरेखाही तशाच असल्याने त्या लोकांना भावल्या. याखेरीज ‘वन रूम किचन’ किंवा ‘वात्रट मेले’ यांसारख्या नाटकांमध्ये गवाणकरांनी अचूक सामाजिक भान ठेवत ज्या व्यक्तिरेखा साकारल्या त्या जिवंत वाटण्याचीही हीच कारणे होती. ‘वस्त्रहरण’ला गवाणकरांच्या लेखणीला जोड मिळाली ती मालवणी भाषेवर प्रभुत्व असणाऱया मच्छिंद्र कांबळी या नटसम्राटाची. या सगळ्यांच्या सहकार्यानेच या कलाकृतीला मोठे यश मिळाले.
अनेकांना आजही हे माहीत नसेल की, सुरुवातीच्या काळात ‘वस्त्रहरण’ बंद करण्याची वेळ आली होती. मात्र मुंबईत झालेला प्रयोग पु. ल. देशपांडे यांनी पाहिला आणि ‘वस्त्रहरणसारखा देशी फार्स मी आजपर्यंत पाहिलेला नाही, मलाही त्यामध्ये भूमिका करायला नक्की आवडली असती,’ अशी कौतुकाची थाप दिली. पुलंच्या या स्तुतीमुळे वस्त्रहरणची लोकप्रियता वाढण्यास मदत झाली. आपल्याकडे एखाद्या मोठय़ा माणसाने ते नाटक पाहिलं आणि गौरवलं तर ते चांगलं ही मानसिकता तयार झालेली आहे. परंतु आपल्यासमोर होणाऱया कलाकृती सर्वांनीच पाहिल्या पाहिजेत, ही मानसिकता आजही दिसून येत नाही. त्यामुळेच अशा अनेक कलाकृती या नजरेबाहेर झालेल्या आहेत. ‘वस्त्रहरण’नंतर गवाणकरांनी लिहिलेले त्यांचे आत्मकथन ‘व्हाया वस्त्रहरण’ हेदेखील प्रत्येकाने वाचण्यासारखे आहे. आयुष्यामध्ये माणसाला किती संकटे येऊ शकतात, याची प्रचिती त्यातून येते.
स्मशानातील वास्तव्यापासून ते बिगारी कामापर्यंतचे नियतीचे सारे खेळ त्यांनी अनुभवले. मात्र त्याचा कुठेही बाऊ न करता अशा कटू अनुभवांचे त्यांनी हास्यात रूपांतर केले. कल्पनेच्या बाहेर ते जगले हेते. त्या सगळ्या दलदलीच्या चिखलातून बाहेर येऊन त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखवले. वेडी माणसे, दोघी, वस्त्रहरण, प्रीतीगंध, चित्रांगदा, वन रूम किचन, वात्रट मेले, वर भेटू नका, पोलीस तपास चालू आहे, वरपरीक्षा, अरे बाप रे!, महानायक, वडाची साल पिंपळाक, भोळा डांबिस, मेलो डोळो मारून गेलो, अशा नाटकांनी गवाणकरांनी मराठी रंगभूमीवर हुकूमी राज्य केले. त्यांना विनम्र श्रद्धांजली.
Comments are closed.