अभिप्राय – बालमनाशी जिव्हाळ्याचा संवाद

>> फारुख एस. काझी

इंद्रजित भालेराव यांची कविता म्हणजे सहजता आणि आशयगर्भता यांचा एक अनोखा संगम. गाव, निसर्ग, गावपांढरी, निरागस माया, पाखरं, गुरं आणि निसर्गाच्या कुशीत वसणाऱया चराचराला आपल्या कवितेत शब्द म्हणून पेरणारे एक प्रतिभावंत कवी. त्यांची प्रत्येक कविता ही जणू त्यांची एखादी आठवण तरी असते किंवा त्यांच्या आतीव इच्छेला दिलेलं शब्दरूप तरी असतं. नुकतेच त्यांचे मुलांसाठीचे तीन कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. या तीनही पुस्तकांसाठी चित्रकार सरदार जाधव यांनी अत्यंत सुंदर चित्रं दिली आहेत.

‘रानमळ्याची वाट’ हा कवितासंग्रह एका अद्भुत अशा निसर्गाच्या सान्निध्याची अनुभूती देतो. घरातील एखादी मोठी व्यक्ती लहान मुलाला हाताला धरून शेतात घेऊन जाते. तिथली पिकं, झाडं, फुलंपाखरं, प्राणी आणि त्यांचं एकमेकांशी असलेलं नातं सांगू लागते तेव्हा तीच कविता होऊन जाते. मुलांना निसर्गाचा अनुभव देण्याची आंतरिक इच्छा यात दिसते.

वाट नव्हे ही कूस मायेची

मातीच्या काळ्या कायेची

ओढ मला घनदाट, रानमळ्याची वाट

शीर्षक कवितेतील या ओळी ज्यात माती, वाट यांच्याशी मायेचं नातं जोडलं गेलं आहे.

निसर्ग म्हटलं की, पाऊस आलाच. या संग्रहात पाऊस विविध रूपांत येतो. ‘पाऊस’ कवितेत ओढ लावताना दिसतो तर कधी ‘झड’ कवितेत बाप हरपलेल्या पोराच्या आईच्या काळजीच्या रूपात भेटतो. ‘ये रे ये रे पावसा’ या कवितेत तो पारंपरिक गीताची ढब घेऊन येतो.

जुनी लिवा प्रणाली दुर्मिळ मध्ये घाबरणे

म्हणून लवंगा तिखट तिखट

या संग्रहात आलेले  कुपाटी, उन्हाचा कार, सुईसाट, डोळ्यांची कोर, मातला, लवणे, खोडा घालणे, पांद, सांद, लोळी, वशिंड असे शब्छ आले आहेत.  ‘शेळीचं पिल्लू’ या कवितेत तर तब्बल चौदा क्रियापदांचा कल्पक वापर केलेला आहे. हे भाषिक सौंदर्य तर मराठीच्या मुळच्या देखण्या रुपडय़ात आणखीच भर घालतं.

दुसरा कवितासंग्रह आहे, ‘गाणे गोजिरवाणे’. इंद्रजित भालेराव यांची जडणघडणच मुळात  ग्रामीण जीवन, तिथल्या परंपरा, लोकसंस्कृती आणि लोकसाहित्य यांच्या कुशीत झालेली आहे. हा कवितासंग्रह म्हणजे मुलांच्या लोकगीतांचा संग्रह आहे. ज्याला कवीने नव्या रुपडय़ात मांडून नवसंजीवनी दिली आहे. एकूण 31 लोकगीतं यात आहेत. ही गीतं वाचताना बऱयाचदा आपण अर्थ शोधण्याचा अट्टाहास करतो, परंतु निरर्थक शब्दाकडून अर्थपूर्ण शब्दांकडे बालकविता जसा प्रवास करते तसंच लोकगीतांचाही प्रवास होत असतो. त्यातूनच लोकोत्तर म्हणी, कल्पितकथा, दैवत कथा, भीती कथा, चित्रकथा, कथागीतं जन्म घेत असतात. यात स्थूल विनोदही असतो आणि त्याचबरोबर भाषिक करामतीही असतात. त्यामुळे त्यांचं वेगळेपण उठून दिसतं.

माय मी भेले, चावडीला गेले

चावडीचे लोक, हसू हसू मेले

कावळे मारून, दिवस केले

या गीतात एक लयबद्धपणा आहे, एक मजा आहे. सहज शब्दांची रचना असल्याने सहज गुणगुणता येते. नव्या ओळी जोडण्याची संधीही आहे. अकल्पित शब्द चमत्कृती साधली आहे.

‘नातुऋतू’ हे तिसरे पुस्तक. यात भालेराव यांनी त्यांच्या नातवाला केंद्रस्थानी ठेवून कविता केल्या आहेत. यात आजोबा, आजी, आई, पप्पा, आजोळ यांच्या नजरेतून बाललीळा चितारल्या आहेत. बाळाचा जन्म, त्याचं रांगणं, दुधाचे दात, जावळ, चालणं, दुडुदुडु धावणं, फिरायला जाणं, त्याचा लागलेला लळा, तो नसल्यावर येणारी उदासी या सर्व गोष्टी यात आलेल्या आहेत.

नातवाच्या जीवनातल्या वाढीच्या काळातले विविध ऋतू इथं अनुभवायला मिळतात. जन्मापासून तो धावू लागेपर्यंतचा प्रवास पाहायला मिळतो.

कवी कवितेच्या माध्यमातून बालमानस, पण खूप सुंदररीत्या उलगडून दाखवतात. ‘जावळ’ या कवितेत दोन ओळी फार मार्मिक आहेत. बाळाच्या भावी आयुष्याची चुणूक त्यात जाणवते.

तान्हेपण सरले माझे

आता वाढेल एकेक ओझे

आयुष्यात पुढे वाढणाऱया जबाबदाऱयांची ही चुणूक तर नसेल? असंही वाटत राहतं. या कवितासंग्रहात नवनव्या शब्दांची मेजवानी आहे. बिनले, आनंदाचा कंद, आरबळून, महूर, कल्लावान, सैताडला, वर्ख, ठकडा, नुरली, मूळ, पाखवा, साजरं असे अनेक अनोखे शब्द मुलांना समजून घ्यायला मजा वाटेल. आनंदी अनुभव देणारा हा कवितासंग्रह आहे.

रानमळ्याची वाट (मूल्य ः 160/-)

गाणे गोजिरवाणे (मूल्य ः 160/-)

नातू (ऑरिगॅमी : 180/-)

कवी ः इंद्रजित भालेराव

प्रकाशक: आदित्य प्रकाशन

Comments are closed.