स्त्री-लिपी – शहाणिवेला साथ अक्षरांची

>> डॉ. वंदना बोकीलकुलकर्णी

बाईच्या उपजत शहाणपणाला जी अनक्षरतेची मर्यादा पडली होती, ती दूर व्हायला लागली आणि मग मात्र तिने ज्या झपाटय़ानं त्या प्रकाशवाटेवरून वाटचाल केली ती अचंबित करणारी ठरली. हा क्रांतिकारक बदल घडला केवळ सावित्रीबाईंमुळेम्हणून सावित्रीबाई 'क्रांतिज्योती'!

आपला सगळा मध्ययुगीन कालखंड म्हणजे साधारणपणे इ.स. 1800 पर्यंतचा काळ हा स्त्राrसाठी जणू एक काळोखा बोगदा होता. बाहेर आक्रमणं, लढाया, धामधूम, अस्थिर राजवटी. स्वराज्य स्थापना, त्याचं रक्षण आणि विस्तार या महत्त्वाच्या घडामोडी तापल्या वातावरणात झुळकीसारख्या होत्या हे खरं, पण स्त्राrसाठी मात्र ‘शिक्षण’,  ‘व्यक्तिमत्त्व विकास’ हे शब्द कोसो दूर होते. घरातच ज्यांना कुणाला अक्षरओळख झाली त्या मोजक्या स्त्रियांच्या पलीकडे फार मोठा स्त्राrवर्ग त्यापासून वंचितच होता. त्यातही पुन्हा गतानुगतिक रूढींचा फार मोठा पगडा होता. बालविवाह, सतीची चाल, केशवपन आणि विधवा पुनर्विवाहाला विरोध या चौकटीत स्त्राr जीवन इतकं जखडलं होतं की, तिथे लहानशी फटही बाहेरच्या वाऱयाला जाऊ येऊ देत नव्हती.

इ.स. 1800 पासून यात जरा जरा मागच्या दाराने म्हणतो तसे बदल होऊ लागले. घरात, समाजात अत्यंत कर्मठ वातावरण आणि खुंटलेला तर्क अशा स्थितीत मुलींच्या शिक्षणासाठी जीवाचं रान करणाऱया फुले दांपत्याच्या प्रयत्नांचं मोल पुनः पुन्हा जाणवतं. मन पुनः पुन्हा त्यांच्या विषयी कृतज्ञतेनं भरून येतं. विशेषत सावित्रीबाई फुले. त्यांना आपण ‘ज्ञानज्योती’ म्हणतो ते त्याचसाठी. ती ज्ञानाची ज्योत त्यांनी लावली, ती सतत तेवती राहील याची दक्षता वाहिली म्हणून आज आपण प्रकाशवाटांवर पावले टाकतो आहोत. 1854 मध्ये त्यांचा ‘काव्यफुले’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. हा मराठीतला पहिला स्त्राr लिखित काव्यसंग्रह. मनात येणाऱया भावना, स्फुरणारे विचार शब्दांत मांडण्याची कला होतीच की, बाईजवळ! आता तिला ती लिहूनही मांडता येऊ लागली. हा फार मोठा आणि क्रांतिकारक बदल होता. म्हणून सावित्रीबाई  ‘क्रांतिज्योती’! त्या ‘कवितेसाठी कविता’ करत नव्हत्या, तर त्यांना त्यांचे विचार त्यातून सांगायचे होते.

ज्ञान नाही विद्या नाहीते घेण्याची गोडी नाही

बुद्धी असुनी चालत नाही

त्यास मानव म्हणावे का?

पशुतुल्य जीवन जगणाऱया सामान्य माणसांना शिक्षणानं ‘माणसात’ आणता येतं हा विश्वास  त्या देतात. शिक्षणानं ‘पशुत्व हाटते’ असं म्हणतात. हळदीकुंकवासारखे सामाजिक उपक्रम जेव्हा सर्रास  होत होते, त्या काळात सावित्रीबाई शिक्षण देण्याचं काम करत होत्या. ही पार्श्वभूमी लक्षात घेतली की, त्यांच्या कामाचं मोल अधिकच लक्षात येतं. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळानं प्रकाशित केलेला सावित्रीबाई फुले यांचा काव्यसंग्रह जरूर पाहायला हवा. त्यांच्या असामान्यत्वाची आणि  त्यांच्या विलक्षण धैर्याची ओळख नीट करून घ्यायला हवी.

मुद्दा हा की, बाईच्या उपजत शहाणपणाला जी अनक्षरतेची मर्यादा पडली होती, ती आता दूर व्हायला लागली आणि मग मात्र तिने ज्या झपाटय़ानं त्या  प्रकाशवाटेवरून वाटचाल केली ती अचंबित करणारी आहे. या सदरातून आपण तेच जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत.

स्त्राrच्या पायांखाली ही अक्षरवाट आली खरी, पण त्या वाटेवरून चालणं काही सोपं नव्हतं. काशीबाई कानिटकर या त्या काळातल्या कथालेखिका. त्यांचा ‘चांदण्यातील गप्पा’ हा कथासंग्रह प्रसिद्ध आहे. आपल्या पतीच्या, गोविंदराव कानिटकर यांच्या प्रोत्साहनाने शिकू लागलेल्या काशीबाईंचा ‘हल्लीच्या स्त्रिया आणि पूर्वीच्या स्त्रिया’ हा निबंध तेव्हा ‘सुबोध पत्रिका’ नावाच्या नियतकालिकात छापून आला म्हणून  काशीबाईंना घरात शिक्षा भोगावी लागली.  त्यांना उपाशी ठेवण्यात आलं आणि कुणीही त्यांचाशी संभाषण केलं नाही ! एका स्त्राrनं पांढऱयावर काळं करणं हा जणू तिचा घोर अपराध मानला गेला!  पण विशेष हे की, म्हणून काशीबाईंनी घाबरून जाऊन शिक्षण-लेखन यांपासून पळ काढला नाही. उलट त्यांनी इंग्रजी भाषेचंही शिक्षण चालू ठेवलं आणि पुढे इंग्रजीतून मराठीत भाषांतर करण्यापर्यंत मजल मारली!

स्त्राrच्या माणूस म्हणून असण्याला न स्वीकारणारा समाज, आजूबाजूच्या परिस्थितीचं विलक्षण दडपण,  त्यातून निर्माण झालेला कमालीचा न्यूनगंड, आत्मविश्वासाचा अभाव यांतून टाकलेली ही पहिली पावलं म्हणून खूप मोलाची आहेत. त्या वाटेवरून चालणाऱया आपल्यासारख्या सगळ्यांना प्रेरणा देणारी आहेत.

vandanabk63@gmail.com

Comments are closed.