क्रिकेटनामा – फिरकीने आपलीच फिरकी घेतली!

>>

काल दुपारी दक्षिण आफ्रिकेने पहिली कसोटी जिंकली तेव्हा वाटलं कुणी तरी माझं मुस्काट सणकावलं आहे. कारण आपला संघ जिंकण्याच्या वल्गना केल्याचं मी विसरलेलो नव्हतो! आपल्या संघाचं अन् संघ व्यवस्थापनाचं तसं नाहीये. आफ्रिकेचा संघ ऑस्ट्रेलियाला फुटाणे चारून जगज्जेते बनलेला आहे हे ते विसरलेले होते. गेल्या काही काळात चोकर्सचा ठप्पा त्यांनी झटकून टाकलेला आहे हे ते विसरलेले होते. पाकमध्ये आपल्यासारख्या खेळपट्ट्यांवर कसोटी खेळून, तयारी करून आलेले आहेत हे ते विसरलेले होते. बव्हुमाच्या नेतृत्वात आफ्रिकेने जिंकलेला हा अकरापैकी दहावा कसोटी सामना आहे! आत्मविश्वास खेळाडूची एकाग्रता कसा वाढवतो हे टेंबाने झळकावलेल्या अर्धशतकामुळे अन् अक्षरच्या झेलावरून अधोरेखित होतं हेसुद्धा ध्यानात ठेवणं आवश्यक होतं!

हरेक खेळाडूचा उपयोग कसा करायचा याचे आडाखे आफ्रिकन संघाकडे पक्के तयार आहेत. तंबूचा वापर ते प्रयोगशाळेसारखा करत नाहीत. हार्मरचा वापर त्यांनी ऑफ स्पिनर म्हणूनच केला. त्याने आठ बळी घेत आपली दाणादाण उडवून दिली. ऑफ स्पिनला खेळपट्टी साथ देतेय म्हटल्यावर टेंबाने मार्क्रमकडेही चेंडू दिला अन् त्याने स्थिरावलेल्या वॉशिंग्टनला बाद केलं!

आपला कप्तान आणि व्यवस्थापन यांनी वॉशिंग्टनला म्हणजे आपल्या ऑफ स्पिनरला संपूर्ण सामन्यात फक्त एक षटक दिलं! त्याला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याचा प्रयोग केला. तेसुद्धा साईला संघाबाहेर ठेवून. काय, गंमत म्हणावी की जंमत!

गंभीर नावाचा गंपू म्हणाला, आम्हाला अगदी अशीच खेळपट्टी हवी होती. मग, मिळाली की जशी हवी तशी खेळपट्टी. माशी कुठे शिंकली! म्हणे, फलंदाजी करणं कठीण नव्हतं. पण फलंदाजांकडे पुरेसा अनुभव नव्हता. मग, असा अनअनुभवी संघ कुणी निवडला? फलंदाजांना सातत्यपूर्ण संधी दिली की मिळतो हो त्यांना अनुभव. संघाबाहेर ठेवून नाही मिळत! शुभमन आणि यशस्वीला एका-दुसऱ्यासमोर ठासून ना अनुभव मिळतो, ना आत्मविश्वास! याच प्रयत्नात इंग्लंड दौऱ्यापासून प्रत्येक स्पर्धेत अन् सामन्यात खेळवून तुम्ही शुभमनला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकवून टाकलंत. शुभमनच्या मानेच्या दुखापतीला हीच गोष्ट जबाबदार आहे. तसंच यशस्वीच्या मनात शंकांचं काहूर निर्माण करून त्याच्याही आत्मविश्वासाला तडा दिलात!

तुम्हाला न्यूझीलंडचे सँटनर अन् एजाज पटेल सोसले नाहीत! मालिका 0-3 पराभूत! कमिन्स, हेझलवूड, स्टार्क अन् ट्रव्हिसच्या अनुपस्थितीत आणि पावसाच्या मदतीने टी-20 जेमतेम जिंकलात. महाराज अन् हार्मरही झेपत नाहीत! त्यात भर, रबाडाही संघात नव्हता. मालिकेत 0-1 पिछाडीवर… ही तुमची तयारी! फिरकीच आपली फिरकी घेते असं म्हणावं का!

आता आपल्या जिव्हावीरांची कशी पंचाईत झालीये पहा. चांगली टणटणीत, चेंडूला उसळी देणारी, चेंडू सीम करणारी खेळपट्टी तयार करण्याची आपली हिंमत नाही. फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर आपलं काय होतं ते तर दिसलंच. इतकंच कशाला, टॉस उडवून सामन्याचा निर्णय घेण्याचा धोकाही आपण पत्करू शकत नाही! त्याचं कारण तर आपल्या ठावकी आहेच! जिंकण्यासाठी काय ब्रं करावं, कसं ब्रं करावं?

Comments are closed.