श्रेयस अय्यरसह 'या' खेळाडूचेही 3 वर्षांनंतर टी-20 संघात पुनरागमन! बीसीसीआयचा मोठा निर्णय

श्रेयस अय्यरचं (Shreyas Iyer) तब्बल तीन वर्षांनंतर भारतीय टी-20 संघात जोरदार पुनरागमन झालं आहे. इतकेच नाही, तर त्याला थेट सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar yadav) जागी कर्णधारपदही सोपवण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एखादा खेळाडू इतका प्रदीर्घ काळ संघातून बाहेर असताना, थेट कर्णधार म्हणून परतणे ही दुर्मिळ घटना आहे, पण बीसीसीआयने ही किमया करून दाखवली आहे. श्रेयस अय्यरसोबतच आणखी एक खेळाडू तीन वर्षांनंतर टी-20 संघात परतला आहे, तो म्हणजे वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा (Prasiddh krishna)

बीसीसीआयने शनिवारी आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संघ जाहीर केला होता, तेव्हा त्यात मोहम्मद सिराजचा (Mohmmed Siraj) समावेश होता. मात्र, नंतर घेतलेल्या निर्णयानुसार सिराजला संघातून बाहेर काढून प्रसिद्ध कृष्णाला संधी देण्यात आली आहे. सिराज गेल्या काही काळापासून सातत्याने क्रिकेट खेळत असल्यामुळे, त्याला दुखापत होऊ नये म्हणून ही विश्रांती देण्यात आली आहे.

प्रसिद्ध कृष्णाने ऑगस्ट 2023 मध्ये आयर्लंडविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 28 नोव्हेंबर 2023 रोजी त्याने आपला शेवटचा टी-20 सामना खेळला होता. त्यानंतर काही महिन्यांतच त्याला संघाबाहेर करण्यात आले होते, मात्र तो इतर टी-20 लीगमध्ये सातत्याने खेळत होता. आतापर्यंत त्याने 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळून 8 विकेट्स घेतल्या आहेत. जर सर्व टी-20 प्रकारांचा विचार केला, तर त्याने 109 सामन्यांत 122 विकेट्स घेतल्या आहेत. सिराजच्या अनुपस्थितीत, आयर्लंडविरुद्धच्या दोन टी-20 सामन्यांच्या मालिकेत प्रसिद्ध कृष्णाला खेळण्याची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. आता या पुनरागमनाचा तो कसा फायदा घेतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

आयर्लंड आणि इंग्लंड टी-20 मालिकेसाठी भारताचा सुधारित संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, वैभव सूर्यवंशी आणि प्रसिद्ध कृष्णा.

Comments are closed.