जपानमध्ये अस्वलाची दहशत; तब्बल 100 शाळा केल्या बंद

जपानमधील एका शहरात गेल्या तीन दिवसांपासून एका अस्वलाने धुमाकूळ घातला असून प्रशासनाची झोप उडवली आहे. शहराच्या विविध भागांत आणि रस्त्यांवर हे अस्वल मुक्तपणे वावरत असल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारी प्रशासनाला तब्बल 100 शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला. या अस्वलाचा शोध घेण्यासाठी शिकारी, स्थानिक पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मिळून एक मोठी शोधमोहीम हाती घेतली आहे.

टोकियोच्या उत्तरेला असलेल्या आणि साधारण 5 लाख 10 हजार लोकसंख्या असलेल्या उत्सुनोमिया शहरात या अस्वलाचा वावर प्रामुख्याने आढळून आला आहे. हे अस्वल निवासी घरांच्या आजूबाजूला, शॉपिंग आर्केड, सार्वजनिक उद्याने आणि शाळांच्या परिसरात सातत्याने दिसून आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. यामुळे प्रशासनाने तातडीने पावले उचलत शहरातील सर्व 94 सरकारी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांसह एकूण 100 शाळा बंद ठेवल्या. एका शहर अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ज्या भागांत अस्वल दिसले आहे, तिथे लोकांना सतर्क राहण्याचे आणि घरात किंवा वाहनांमध्येच थांबण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच शिकारी आणि पोलिसांचे पथक या प्राण्याचा कसून शोध घेत आहेत. हे अस्वल शनिवारी पहिल्यांदा दृष्टीस पडले होते. अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार हे अस्वल सुमारे तीन फूट लांब आहे. मात्र, शहरात फिरणारे हे एकच अस्वल आहे की एकापेक्षा जास्त प्राणी आहेत, याबाबत अद्याप निश्चित माहिती मिळालेली नाही.

या अस्वलाच्या चातुर्याबाबत बोलताना फुकुशिमा शहराचे महापौर युकी बाबा यांनी सांगितले की, हे अस्वल पाणी पिण्यासाठी चक्क नळ चालू करताना दिसले, तसेच बंद असलेली खिडकी स्वतःहून उघडण्यातही ते यशस्वी झाले. यावरून ते अत्यंत बुद्धिमान अस्वल असल्याचे दिसून येते. दरम्यान, तज्ज्ञांच्या मते, हवामान बदलामुळे जंगलातील अस्वलांच्या नैसर्गिक अन्नस्रोतांचा पुरवठा कमालीचा कमी झाला आहे. त्यामुळे भुकेली अस्वले अन्नाच्या शोधात शहरांकडे वळत आहेत. मानवांवर होणाऱ्या अस्वलांच्या हल्ल्यांमध्ये झालेली वाढ पाहता, जपान सरकारने अलीकडेच आपल्या कठोर बंदूक कायद्यात सुधारणा केली असून, आणीबाणीच्या परिस्थितीत निवासी भागांतही अस्वलांविरुद्ध शस्त्रे वापरण्याची परवानगी दिली आहे. अलिकडच्या वर्षांत जपानमध्ये अस्वले मानवी वस्तीत दिसण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, आता हा धोका थेट शहरी भागांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या वर्षभरात देशभरात अस्वले दिसल्याच्या 50 हजारांहून अधिक घटनांची नोंद झाली आहे, तर 2024 मध्ये अस्वलांच्या हल्ल्यात 13 लोकांचा मृत्यू झाला होता, जी आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे.

Comments are closed.