नवऱ्याच्या मृत्यूचे ढोंग रचून बायको ओक्साबोक्सी रडली, दुसरीकडे पतीच्या मित्राला ‘कार्यक्रम ओके’

बीड क्राईम न्यूज : एका बाजूला पतीच्या मृत्यूचे ढोंग रचून ओक्साबोक्सी रडणारी पत्नी आणि दुसऱ्या बाजूला ‘काम फत्ते’ झाल्याचा निरोप देणारा प्रियकर…एखाद्या गुन्हेगारी चित्रपटाच्या पटकथेलाही मागे टाकेल असा थरार बीड जिल्ह्यातील नेकनूर भागात उघडकीस (Beed Crime News) आला. अनैतिक संबंधांच्या आड येणाऱ्या पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने अत्यंत क्रूरपणे पतीचा ‘गेम’ वाजवला आणि त्यानंतर एकमेकांना फोन करून ‘कार्यक्रम ओके’ अशी कोडवर्डमध्ये खात्री करून घेतल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली.

एक जून रोजी बीड जिल्ह्यातील लिंबागणेश ते अंजनवती रस्त्यावर 27 वर्षीय किरण बंडू सोनवणे या तरुणाचा मृतदेह एका दुचाकीखाली दबलेल्या अवस्थेत आढळून आला होता. प्रथमदर्शनी हा अपघात वाटत असला, तरी नेकनूर पोलिसांनी संशयावरून तपास सुरू केला. शवविच्छेदन अहवालात किरणच्या गळ्यावर आवळल्याचे व्रण आढळून आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक विश्लेषण आणि संशयास्पद फोन कॉल्सचा माग काढत पोलिसांनी थेट मृत किरणची पत्नी प्रियंका सोनवणे, तिचा प्रियकर दशरथ परदेशी आणि त्याचा मित्र धीरज येडे यांना बेड्या ठोकल्या. (Beed Crime News)

अपघाताचा बनाव रचण्यासाठी त्याचा मृतदेह रस्त्याशेजारी दुचाकीखाली दाबून ठेवला- (Beed Crime News)

या थरारक हत्याकांडाची सुरुवात सात वर्षांपूर्वी झाली होती. प्रियंका आणि किरण यांचा प्रेमविवाह झाला होता, परंतु किरणला दारूचे व्यसन जडल्याने तो प्रियंकाला सतत मारहाण आणि छळ करत असे. याच दरम्यान किरणचा मित्र दशरथ परदेशी याच्याशी प्रियंकाचे सूत जुळले आणि त्यांच्यात अनैतिक संबंध सुरू झाले. पतीच्या रोजच्या त्रासाला कंटाळलेल्या आणि प्रेमात आंधळ्या झालेल्या प्रियंका आणि दशरथ यांनी दीड महिन्यांपूर्वीच किरणला संपवण्याचा कट रचला होता. 31 मे रोजी दशरथने आपला मित्र धीरज येडे याला दारू पाजून या कटात सामील करून घेतले. ठरलेल्या प्लॅननुसार, निर्जन स्थळी नेऊन किरणचा रुमालाने गळा आवळून खून करण्यात आला आणि अपघाताचा बनाव रचण्यासाठी त्याचा मृतदेह रस्त्याशेजारी दुचाकीखाली दाबून ठेवण्यात आला.

प्रेमाच्या जाळ्यात अडकून गुन्हेगार बनलेले प्रियंका आणि दशरथ सध्या पोलीस कोठडीत- (Beed Crime News)

गुन्हा लपवण्यासाठी आरोपी धीरजने स्वतःच्याच गाडीतून किरणचा मृतदेह रुग्णालयात नेण्याची नाटकबाजी केली, तर प्रियंका घरात बसून रडण्याचे ढोंग करत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, पोलिसांनी कौशल्याने तपास करत या संपूर्ण कटाचा पर्दाफाश केला. खून झाल्यानंतर प्रियंका आणि दशरथ यांच्यात ‘कार्यक्रम ओके’ झाल्याचा अंतिम फोन कॉल झाला होता, जो पोलिसांच्या तपासात मुख्य पुरावा ठरला. मित्राच्या नादी लागून स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करून घेणारा धीरज आणि प्रेमाच्या जाळ्यात अडकून गुन्हेगार बनलेले प्रियंका आणि दशरथ सध्या पोलीस कोठडीत असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

ही बातमीही वाचा:

Crime News: 36 वर्षीय बायकोचे 25 वर्षांच्या तरुणासोबत अनैतिक संबंध, नवऱ्याला संपवले अन्…; ठाण्यातील जलसंधारण विभागातील अभियंताच्या मृत्यूचं गूढ उकललं!

Comments are closed.