पुन्हा एकदा बेन स्टोक्स स्कॅंडलमध्ये अडकला! मालिकेच्या मध्यातच कसोटी कर्णधारपद जाण्याची शक्यता
सध्या इंग्लंड पुरुष क्रिकेट संघ मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. यामधील पहिला कसोटी सामना लॉर्ड्सवर झाला, जो यजमानांनी जिंकला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. संघाच्या या विजयी सुरूवातीनंतरही बेन स्टोक्सचे कर्णधारपद धोक्यात आले आहे. त्याला तो स्वत: च जबाबदार आहे. यामागे त्याचा फॉर्म नसून वेगळेच कारण आहे.
न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवल्यानंतर स्टोक्स आणि त्याचा सहकारी गस ऍटकिन्सन एका नाईट क्लबमध्ये गेले, जिथे ते एका अशा घटनेत अडकले, ती आता त्या दोघांसाठी अडचणीचे कारण बनली आहे.
रविवार (७ जून) लॉर्ड्सवर झालेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव केला. इंग्लंडने चार दिवसांतच सामना जिंकत मालिकेत आघाडी घेतली. या सामन्यात ऍटकिन्सनने पाच विकेट्स घेतल्या. सामन्यात मिळालेल्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी स्टोक्स आणि ऍटकिन्सन हे एका नाईटक्लबमध्ये गेले, जेथे ते एका घटनेत अडकले. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) याला नियमांचे उल्लंघन म्हटले आहे.
याबद्दल ईसीबीने सोमवारी (८ जून) एक निवेदन प्रसिद्ध केले. त्यामध्ये म्हटले की, सोमवारी सकाळी (७-८ जूनच्या रात्री) घडलेल्या एका घटनेत सामील असलेल्या स्टोक्स आणि ऍटकिन्सन यांची चौकशी केली जात आहे. बोर्डाने म्हटले, ‘ न्यूझीलंडविरुद्धचा पहिला पुरुष कसोटी सामना संपल्यानंतर झालेल्या सांघिक नियमांच्या उल्लंघनाची ईसीबी चौकशी करत आहे.
‘बेन स्टोक्स आणि गस ऍटकिन्सन सोमवारी पहाटे एका नाईटक्लबमध्ये असताना एक घटना घडली. आम्ही सध्या अधिक माहिती गोळा करत आहोत आणि दुसऱ्या कसोटीसाठीचा संघ योग्य वेळी जाहीर करू. क्रिकेट नियामकाला माहिती देण्यात आली आहे आणि आम्ही योग्य वेळी अधिक माहिती देऊ’, असेही त्या निवेदनात पुढे म्हटले आहे.
या घटनेचा तपास सुरू असून स्टोक्स आणि ऍटकिन्सन दोघेही १७ जून रोजी ओव्हलमध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीला मुकण्याची शक्यता आहे. या घटनेत दोन्हीपैकी कोणताही खेळाडू जखमी झाला नाही. असे समजते की, या घटनेत सारासेन्स रग्बी क्लबचे खेळाडू सामील होते, जे त्यांच्या हंगाम-समाप्ती सोहळ्याचा एक भाग म्हणून तेथे उपस्थित होते.
स्टोक्स आणि स्कॅंडल हे एक समीकरण बनत चालले आहे. २०१७ मध्येही अशीच एक घटना घडली होती, ज्यामध्ये त्याचा समावेश होता. ब्रिस्टल येथील एका नाईटक्लबबाहेर घडलेल्या एका घटनेमुळे त्याच्यावर सार्वजनिक ठिकाणी मारामारी केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. त्यानंतर त्याला २०१७-१८ च्या ॲशेस दौऱ्याला मुकावे लागले, मात्र पुढे त्याला या आरोपातून निर्दोष मुक्त करण्यात आले.
Comments are closed.