महाराष्ट्राचे सुपुत्र, बिहारचा सिंघम शिवदीप लांडेंचं काय होणार? बिहारच्या कोणत्या मतदारसंघातून
शिवदीप लांडे बिहार निवडणूक निकाल 2025: बिहारमध्ये आपल्या धडाकेबाज कामगिरीमुळे सिंघम अशी ओळख निर्माण केलेले आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे हे यंदा बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar Vidhansabha Election 2025) आपले नशीब आजमावत आहेत. शिवदीप लांडे (Shivdeep Lande) हे बिहारच्या जमालपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर इंडियन इनक्लूझिव्ह पार्टीच्या (IIP) नरेंद्र कुमार तांती आणि जदयूच्या नचिकेता मंडल यांचे आव्हान आहे. शिवदीप लांडे यांनी निवडणुकीपूर्वी हिंद सेना पक्षाची स्थापना केली होती. मात्र, ते या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढत आहेत. आज बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. त्यामुळे शिवदीप लांडे हे जमालपूर मतदारसंघातून विजयी होणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
बिहार पोलीस दलात 18 वर्षे काम केल्यानंतर शिवदीप लांडे (Shivdeep Lande) यांनी हा निर्णय घेतला होता. शिवदीप लांडे हे राज्याचे माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांचे जावई आहेत. 2006 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले शिवदीप लांडे हे सध्या बिहारच्या स्पेशल टास्क फोर्समध्ये अधीक्षक होते. त्यांच्या बेधडक कामाच्या पद्धतीमुळे ते बिहारच्या जनमानसात प्रचंड लोकप्रिय आहेत. मध्यंतरी त्यांनी मुंबईत अमली पदार्थ विरोधी कक्षातही काम केले होते. तेव्हाही शिवदीप लांडे यांनी ड्रग्ज तस्करांचे कंबरडे मोडले होते. तर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त असताना अनेक महत्त्वाचे गुन्हे उघडकीस आणले होते. राज्यात गाजलेल्या मनसुख हिरण हत्याप्रकरणाच्या तपासातही शिवदीप लांडे यांचा समावेश होता.
निवडणुकीच्या शपथपत्रात नमूद केल्यानुसार, शिवदीप लांडे यांच्या बँक खात्यात 20 लाख 33 हजार रुपये आणि विविध ठिकाणी केलेली गुंतवणूक 6.65 कोटींच्या घरात आहे. लांडे यांच्यावर अडीच कोटींचे गृहकर्ज आहे. याशिवाय, त्यांच्याकडे 20 लाखांची एक कार आहे. शिवदीप लांडे यांच्या पत्नीकडे 100 ग्रॅम सोने असून त्या व्यावसायिक असल्याचे शपथपत्रात नमूद करण्यात आले आहे. शिवदीप लांडे यांनी बिहार पोलिसांच्या सेवेत असताना उल्लेखनीय काम केले होते. ते 2009 मध्ये मुंगेरमध्ये एएसपी म्हणून रुजू झाले होते आणि 2011 पर्यंत तिथेच काम केले. तीन वर्षांत मुंगेर मधील गुन्हेगारी संपवण्यावर भर दिला. यामुळे मुंगेरमध्ये शिवदीप लांडे यांना मानणारा मोठा तरुण वर्ग आहे. या भागात त्यांची लोकप्रियता प्रचंड आहे. त्यामुळेच त्यांनी बिहार आपली कर्मभूमी असल्याचे सांगत येथून विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.