BLOG : ‘रो-को’, जैस्वाल जोशात; मालिका खिशात
ब्लॉग: “करो या मरोची स्थिती निर्माण झाली की आमचा खेळ बहरतो. मला आनंद आहे रोहित आणि मी आताही संघासाठी योगदान देतोय.” विराट कोहली आहे.
विशाखापट्टणमच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेला चिरडून टाकल्यावर पारितोषिक वितरणावेळी कोहलीने व्यक्त केलेलं मनोगत. यातला त्याने वापरलेला आताही अर्थात आताही हा शब्द फार महत्त्वाचा आहे. याला पार्श्वभूमी अर्थातच सोशल मीडियावर रंगलेल्या विराट, रोहितच्या वाढत्या वयाच्या चर्चांची, वनडे कारकीर्दीतील त्यांच्या भविष्याची, येत्या २०२७ च्या वर्ल्डकपमध्ये ते खेळणार का याचीही.
या सगळ्या चर्चांना या दोघांनीही बॅटनेच सडेतोड उत्तर दिलंय. तसं दोघंही आतापर्यंत बॅटनेच जास्त बोललेत. आजच्या घडीला रोहितचं वय आहे ३८ वर्षे २२१ दिवस तर कोहलीचं ३७ वर्ष ३१ दिवस. आजच्या घडीला वाढलेलं वनडे क्रिकेट हे साहजिकच एखाद्या पस्तीशी पार खेळाडूसाठी अधिक आव्हानात्मक ठरत असतं. त्यात हे दोघंही आयपीएलमध्येही सातत्याने खेळतायत. या सर्व बाबींचा विचार केल्यावर या दोघांनीही सध्याच्या घडीला दाखवलेला फिटनेस कमाल आहे. म्हणजे विराटचा तो आधीपासूनच होता. रोहितने त्यावर आता आणखी काम केलंय.
मालिकेत १-१ च्या बरोबरीनंतर मालिका समसमान स्थितीत होती. निर्णायक सामन्यात मात्र भारताने आज पहिल्या सत्रापासूनच ग्रिप सोडली नाही. अगदी डीकॉक-बवुमा जोडी टिकली होती तेव्हाही. दोन बाद १६८ वरून आपण त्यांना २७० वर रोखलं. कुलदीप, कृष्णाने कमाल केली.
टार्गेट तसं मर्यादित असलं तरी धावांचा पाठलाग करताना पहिल्या १० ओव्हर्स क्रुशल असतात. अशा वेळी रोहितची परिपक्वता आणि जैस्वालची ऊर्जा यांची युती झाली आणि दीड शतकी भागीदारीचं सरकार स्थापन झालं. तिथेच विजयाचा उंबरठा आपणच ओलांडणार हेही नक्की झालं. रनरेट सहापेक्षाही कमी होता. त्यात रोहित-जैस्वालने १५५ धावा फलकावर लावल्या. चौकार, षटकारांच्या आवश्यक तितक्याच सरी रोहितच्या बॅटमधून कोसळल्या. मुसळधारेची गरजच नव्हती. कारण टार्गेट ३०० च्या आत होतं.
सलामीवीर जैस्वालने तीन आकडी स्कोअर गाठला. तो नाबाद राहिला हेही चांगलं झालं. मॅचनंतर तो म्हणाला, चांगल्या सुरुवातीनंतर मोठ्या खेळीत रुपांतर माझ्याकडून होत नव्हतं. त्यामुळे आपल्या इनिंगचा समतोल कसा साधायचा याचाच विचार करत होतो. जैस्वालचे हे बोल हे अभ्यासू खेळाडूचं लक्षण आहे. त्यात त्याच्यासमोर क्रिकेटची दोन विद्यापीठंच जणू फलंदाजी करत होती. नॉन स्ट्राईक एन्डकडून दोघांचा खेळ पाहणं हा जैस्वालसाठी कोणत्याही पुस्तकातले किंवा व्हिडीओतले धडे घेण्यापेक्षा उत्तम अभ्यास होता.
रोहित बाद झाल्यावर धावाधीश विराट मैदानात उतरला आणि त्याने समोर क्लब लेव्हलचे गोलंदाज असल्याच्या थाटात ऐटीत फलंदाजी केली. ४५ चेंडूंत नाबाद ६५…सहा चौकार, तीन षटकार. म्हणजे ४२ धावा फटक्यांमधूनच वसूल. एरवी एकेरी-दुहेरीचा मनसोक्त खुराक घेणारा विराट आज मात्र मोठ्या फटक्यांवर तुटून पडला. त्याचा फिटनेस, त्याची धावांची भूक कमाल आहे. ३०८ मॅचेसमध्ये साडे चौदा हजारपेक्षा जास्त वनडे रन्स. ५८ चा अॅव्हरेज. ५३ शतकांचे शानदार तुरे मुकुटात.
या वनडे मालिकेत तीन सामन्यांमध्ये दोन शतकं, एक नाबाद अर्धशतक. ३०२ धावांचा रतीब. हे आकडे अवाक् करणारे आहेत. कसोटी तसंच टी-ट्वेन्टीला अलविदा करत कोहलीने वनडे कारकीर्दीवर फोकस करण्याचं ठरवलं आणि तो फोकस किती जबरदस्त आहे हेच क्रिकेटविश्वाने पाहिलं. २०२७ चा वर्ल्डकप हा त्या वर्षाच्या अंदाजे ऑक्टोबर-नोव्हेंबरला होतोय. गेल्या २०२३ च्या वर्ल्डकपमध्ये या दोघांचीही बॅट तळपली होती. फायनलला ऑस्ट्रेलियाने आपल्याला रोखलं, नाहीतर तो वर्ल्डकप आपलाच होता.
वनडे क्रिकेटच्या त्या सर्वोच्च मंचावर आपण विजयाची भैरवी गाता गाता राहिलो. याची सल, बोच या दोघांच्याही मनात आहे. त्यात आता दोघांकडेही कर्णधारपद नसल्यानं दोघंही अधिक मोकळेपणाने खेळतायत. या दोघांच्याही बॅटमधून धावांचा ओघ असाच वाहत राहिला तर २०२७ मध्ये पुन्हा विश्वविजेतेपदाचा मुकूट आपल्या डोक्यावर झळकेल हे निश्चित. कसोटी मालिकेतील पराभवाने जे निराशेचं मळभ दाटलं होतं, ते या दिमाखदार विजयाने काही प्रमाणात दूर केलंय. आता सूर्यकुमार यादवच्या टी-ट्वनेटी टीम इंडियाला ऑल द बेस्ट म्हणूया.
Comments are closed.