सचिन-विराटला डावललं! ब्रायन लाराच्या GOAT आणि लिजेंड यादीत 'या' 2 भारतीयांची एंट्री

वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराने क्रिकेटविश्वात खळबळ उडवणारी यादी जाहीर केली आहे. लाराने भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला सर्वकालीन महान गोलंदाज (GOAT) म्हणून गौरवले असून, रोहित शर्माला क्रिकेट लीजेंड्सच्या यादीत स्थान दिले आहे. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे या दोन्ही यादींत सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांना स्थान देण्यात आलेले नाही.

लाराने इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूंनी आयोजित केलेल्या ‘Stick to Cricket’ या पॉडकास्टमध्ये त्यांच्या ‘GOAT’ आणि ‘लीजेंड’ यादीचे नाव उघड केले. बुमराह, ग्लेन मॅकग्रा, जॅक्स कॅलिस आणि अ‍ॅडम गिलख्रिस्ट यांना त्यांनी सर्वकालीन महान खेळाडू मानले असून, रोहित शर्मा, क्रिस गेल, शाहीन शाह आफ्रिदी, केविन पीटरसन आणि केन विल्यमसन यांचा लीजेंड्समध्ये समावेश केला आहे.

जसप्रीत बुमराहने आत्तापर्यंत 206 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 455 बळी घेतले असून, त्याची सरासरी 20.47 इतकी प्रभावी आहे. कसोटीमध्ये त्याने 47 सामन्यांत 217 बळी घेतले आहेत. त्याचा सर्वोत्कृष्ट स्पेल 6/19 असा आहे.

दरम्यान, रोहित शर्माने 499 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 19,700 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक तीन दुहेरी शतकांचा विक्रम त्याच्याच नावावर आहे.

ब्रायन लाराने केलेल्या GOAT आणि लीजेंड यादीमुळे क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चेला उधाण आले आहे. अनेकांनी सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांची अनुपस्थिती पाहून आश्चर्य व्यक्त केले असून, लाराचा दृष्टिकोन नव्या पिढीकडे अधिक झुकलेला असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. त्यांनी निवड करताना पारंपरिक आकड्यांपेक्षा फॉर्मेट्समधील प्रभाव, सामन्यावर परिणाम करणारी कामगिरी, आणि आधुनिक शैलीतील क्रिकेटला दिलेली दिशा याला अधिक महत्त्व दिले आहे. त्यामुळे त्यांच्या यादीत नावीन्य, खेळातील उत्क्रांती आणि सामन्यांवरील थेट प्रभाव हे निकष ठळकपणे दिसून येतात.

Comments are closed.