15 दिवसांत माफी मागा, अन्यथा…; आमदार संजय गायकवाडांना भाजप नेत्याकडून 100 कोटींची नोटीस

बुलढाणा : आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे, कृत्यामुळे नेहमीच चर्चेत असलेल्या शिवसेना आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, आता महायुतीमधील (BJP) मित्रपक्षाच्या नेत्यानेच त्यांना तब्बल 100 कोटींच्या अब्रु नुकसानीचा दावा ठोकत नोटीस बजावली आहे. काही दिवसांपूर्वी दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित पुस्तकाच्या प्रकाशकाला फोनवरुन शिवीगाळ केल्यानंतर राज्यभरातून त्यांच्याबद्दल संतप्त प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यानंतर, पक्ष नेतृत्वानेही त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करत सूचना केल्या होत्या. आता, बुलढाणा (Buldhana) भाजप जिल्हाध्यक्षांनीच संजय गायकवाड यांना नोटीस बजावली आहे. तर, संजय गायकवाड यांच्यावर पॉक्सो, अॅट्रॉसिटी व मानवाधिकार उल्लंघन यांच्यासारखे गंभीर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी वकील असीम सरोदे यांनी केली आहे.

बुलढाण्यातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी गेल्या 06 एप्रिल आणि 10 एप्रिल रोजी पत्रकार परिषदेत बुलढाणा भाजपचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यावरुन जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. आता, याप्रकरणी भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी वकील असीम सरोदे यांच्यामार्फत संजय गायकवाड यांना 100 कोटी रुपयांच्या अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली आहे. शिवाय पंधरा दिवसात सार्वजनिकरित्या माफीही मागायला सांगितली आहे.

दरम्यान, या नोटीसीसह वकील असीम सरोदे यांनी बुलढाणा पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून संजय गायकवाड यांनी पोक्सो, ॲट्रॉसिटी आणि मानवाधिकार यांसारख्या कायद्यांचं उल्लंघन केल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे, त्यांच्यावर वरील गंभीर कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत, अशी विनंती देखील सरोदे यांनी केली आहे. त्यामुळे, आमदार संजय गायकवाड पुन्हा चर्चेत आणि अडचणीत आले आहेत. आता, या नोटीसला संजय गायकवाड काय उत्तर देतात, की जाहीर माफी मागतात ते पाहावे लागेल.

वादग्रस्त भूमिकांमुळे नेहमीच चर्चेत

दरम्यान, संजय गायकवाड नेहमीच आपल्या वादग्रस्त भूमिकांमुळे माध्यमांत चर्चेत असतात. आमदार निवासातील कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणीमुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. त्यानंतर, शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकाला केलेल्या शिवीगाळीनंतर त्यांच्याविरुद्ध बुलढाण्यात आंदोलनही करण्यात आले होते. तर, जिल्ह्यातील भाजप नेत्यांसोबतचा त्यांचा वादही सर्वश्रुत आहे. त्यावरुनच, आता त्यांना अब्रु नुकसानीची नोटीस बजावण्यात आली आहे.

हेही वाचा

ल्हा बँकेसाठी मुलाचा अर्ज बाद करण्यामागे काय राजकारण माहीत नाही, देवेंद्रजी योग्य तो न्याय करतील : अब्दुल सत्तार

गोकुळ गितेंची मनधरणी होईना, तीन-तीन मंत्र्यांचे प्रयत्न अपयशी; संकटमोचक गिरीश महाजनांवरच संकट?

Comments are closed.