हिंजवडी आयटी पार्कमध्ये बसने पादचाऱ्यांना चिरडले, चिमुकल्या भावासह दोन बहिणींचा मृत्यू

आयटी कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱया दारूच्या नशेतील बसचालकाचे नियंत्रण सुटून थेट पदपथावर गेली. या भरधाव बसने पदपथावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांना चिरडले. या भीषण अपघातात सहा वर्षांच्या चिमुकल्या भावासह सोळा आणि नऊ वर्षीय दोन बहिणींचा बळी गेला, तर दुचाकी चालकासह एक महिला गंभीर जखमी झाली.
ही घटना हिंजवडी येथील पंचरत्न चौकाजवळ सोमवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सूरज प्रसाद (6), अर्चना प्रसाद (9) प्रिया प्रसाद (16) अशी मृतांची नावे आहेत, तर दुचाकीचालक अविनाश चव्हाण (26) आणि विमल ओझरकर (40) अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर औंध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बसचालक नागनाथ गुजर (36) याला हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोमवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास 16 वर्षीय प्रिया ही आपली धाकटी भावंड अर्चना आणि सूरज यांना शाळेतून घरी नेत होती. पंचरत्न चौकातून पायी जात असताना हा अपघात झाला.
अपघातग्रस्त बसचा चालक दारू प्यायला होता. दारूच्या नशेतच त्याने भरधाव वेगाने बस चालविली. त्यातून गाडीवरील ताबा सुटला या अपघातानंतर घटनास्थळी नागरिक गोळा झाले व मद्यधुंद अवस्थेतील चालकाला चोप दिला.

Comments are closed.