तहान भागवण्यासाठी बस थांबवली

सध्या भारतात सर्वत्र उष्णतेच्या लाटेचा कहर होत आहे. अनेक राज्यांमधील तापमानांनी मागचे विक्रम मोडले आहेत. त्यामुळे उघड्या जलस्रोतांचे वेगाने बाष्पीभवन होत आहे. वनभागांमधील तळी आणि सरोवरे कोरडी पडत आहेत. त्यामुळे वन्य जीव तहानेने व्याकूळ होऊन पाण्याच्या शोधार्थ भटकंती करु लागले आहेत. विशेषत: आकाराने मोठ्या असणाऱ्या वन्य प्राण्यांची तर अधिकच अडचण होऊ लागली आहे. विविध राज्यसरकारांच्या वनविभागांनी वनप्रदेशांमध्ये प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्याचा प्रयत्न चालविला असला तरी तो अपुरा आहे.

अशा स्थितीत महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात घडलेली एक अद्भूत घटना सध्या चर्चेचा विषय बनली आहे. या जिल्ह्यातील पुसद येथे एका घाटात वन्य वानरांनी पाण्यासाठी प्रवासी बस रोखल्याचा प्रकार समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी या घाटातून एक प्रवासी बस जात असताना एक मोठा वानर अचानक या बसच्या मार्गात येऊन उभा राहिला. त्याला पाहून बस चालकाने बस थांबविली. त्यानंतर अनेक वानरे मार्गावर आणि बसच्या अवतीभोवती गोळा झाली. त्यांच्याकडे पाहून ती अत्यंत तहानलेली आहेत, हे स्पष्ट दिसत होते. त्यामुळे प्रवाशांनी त्यांच्याकडे असलेले पिण्याचे पाणी या वानरांना दिले. वानरांना पाणी पाजण्यासाठी अनेक प्रवासी बसमधून खाली उतरले आणि त्यांनी वानरांना त्यांच्या वॉटरबॅगमधील किंवा पाण्याच्या बाटल्यांमधील पाणी पाजविले. पाणी मिळाल्याने वानरे संतुष्ट झाली आणि तेथून निघून गेली. वानरे ही बुद्धीमान असतात. बसमधील प्रवाशांकडे पाणी असते हे वानरांना अनुभवाने माहीत असते. त्यामुळे त्यांनी बस अडविली असावी असे तज्ञांचे म्हणणे आहे. अनेक प्रवाशांनी या प्रसंगाचे छायाचित्रणही त्यांच्या मोबाईलमध्ये करुन घेतले. आवश्यकता असेल, तर मानव आणि प्राणी यांच्यात सहकार्य कसे होऊ शकते, हे यावरुन दिसून येते.

Comments are closed.