ट्रम्प तात्या म्हणतात, मला हुकूमशहा म्हणा पण मूर्ख म्हणू नका… लय वाईट वाटतं
इराणवर युद्ध लादल्यामुळे जगभरातून टीका होत असलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे एका वेगळ्याच वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. ‘‘मला एकवेळेस जुलमी, अत्याचारी आणि हुकूमशहा म्हटले तरी चालेल, पण मला मूर्ख म्हणू नका,’’ असे ट्रम्प म्हणाले. न्यूयॉर्क येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. मूर्ख म्हणवून घेणे हा आपला अपमान वाटतो, असे ट्रम्प म्हणाले.
महागाई आणि सर्वसामान्य लोकांशी संबंधित असलेल्या प्रश्नावर ते एका कार्यक्रमात बोलत होते. त्या वेळी ते म्हणाले की, अनेकदा टीकाकार आपल्याला मूर्ख म्हणून टीका करत असतात. मात्र तो मला अपमान वाटतो. मला हुशार हुकूमशहा म्हटलेले आवडेल. मात्र मूर्ख म्हटलेले चालणार नाही, असे ट्रम्प मिश्किलपणे म्हणाले.
अमेरिकेतील 30 मानसोपचारतज्ञ आणि मानसोपचार क्षेत्रात काम करत असणाऱया डॉक्टरांनी ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष पद सांभाळण्यास मानसिकदृष्टय़ा अयोग आहेत, असा दावा एका निवेदनाद्वारे केला होता. ट्रम्प यांची अण्वस्त्र वापरण्याची क्षमता जगासाठी धोकादायक ठरू शकते, असेही या निवेदनात म्हटले होते.
ट्रम्प यांनी डॉक्टरांकडे चाचणीही केली
ट्रम्प यांनी याबाबत एका डॉक्टरकडे एखादी चाचणी आहे का, याबाबत विचारणा केली. डॉक्टरांनी त्यांना कॉग्निटिव्ह चाचणी असल्याचे सांगितले. या चाचणीत सुरुवातीला सोपे आणि नंतर अवघड प्रश्न येतात. अशी बौद्धिक चाचणी तीन वेळा दिल्याचे ट्रम्प म्हणाले. राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी अशी चाचणी द्यायला हवी, असे मतही त्यांनी या वेळी माडले. मात्र ही चाचणी स्मृतिभ्रंशाशी संबंधित असून वारंवार अशी चाचणी घेण्याची गरज आहे, असा सवाल उपस्थित करत तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.
रेडय़ाची ट्रम्प यांच्याशी तुलना
बांगलादेशातील एका पांढऱ्या रेड्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. रेडय़ाचा चेहरा आणि केस ट्रम्प यांच्यासारखे आहेत, अशी चर्चा रंगली आहे. मात्र ट्रम्प यांच्याशी तुलना केल्यामुळे बांगलादेशी रेडा नाराज झाल्याचा टोला इराणने लगावला आहे.
Comments are closed.