मोठा उलटफेर..! अफगाणिस्तानने इंग्लंडला चारली धूळ, चॅम्पियन्स ट्रॉफीतून तिसरी टीम बाहेर
अफगाणिस्तानने पुन्हा एकदा क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे. इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाला हरवून अफगाणिस्तानने मोठा अपसेट निर्माण केला आहे. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पहिल्या विजयासह अफगाणिस्तानने उपांत्य फेरीच्या शर्यतीत स्वतःला कायम ठेवले आहे, तर इंग्लंड अंतिम 4 च्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने सलामीवीर इब्राहिम झद्रानच्या 177 धावांच्या मदतीने 50 षटकांत 7 गडी गमावून 325 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडचा संघ 49.5 षटकांत 317 धावांवर सर्वबाद झाला आणि अफगाणिस्तानने ८ धावांनी सामना जिंकला. विक्रमी 177 धावा केल्याबद्दल इब्राहिम झद्रानला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
इंग्लंडकडून जो रूटने सर्वाधिक 120 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून अझमतुल्लाह उमरझाईने गोलंदाजीत 5 बळी घेतले. मोहम्मद नबीने 2 फलंदाजांचे बळी घेतले. अफगाणिस्तान संघाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग दुसऱ्यांदा इंग्लंडला पराभूत केले आहे. यापूर्वी, 2023 च्या विश्वचषकात दिल्लीत खेळल्या गेलेल्या सामन्यात अफगाणिस्तान संघाने इंग्लंडचा 69 धावांनी पराभव केला होता.
इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील हा रोमांचक सामना ‘करो या मरो’ असा होता. दरम्यान, अफगाणिस्तानने विजय मिळवून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीच्या शर्यतीत स्वतःला कायम ठेवले आहे, तर इंग्लंड पराभवानंतर स्पर्धेतून बाहेर पडला आहे. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडणारा इंग्लंड हा तिसरा संघ आहे. यापूर्वी, यजमान पाकिस्तान आणि बांगलादेश उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.
भारत आणि न्यूझीलंड यांनी ग्रुप अ मधून आधीच उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आता ग्रुप-ब मधील 2 सेमीफायनल संघांचा निर्णय अजून बाकी आहे. उपांत्य फेरीतील दोन स्थानांसाठी ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात स्पर्धा आहे. ग्रुप बी मध्ये, दक्षिण आफ्रिका 3 गुणांसह अव्वल स्थानावर आहे तर विश्वविजेता ऑस्ट्रेलिया तेवढ्याच गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही संघांमध्ये फक्त नेट रन रेटचा फरक आहे. 2 सामन्यांतील पहिल्या विजयानंतर अफगाणिस्तान 2 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर, इंग्लंड स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
हेही वाचा –
अफगाणिस्तानचा शानदार विजय, इंग्लंडचा चॅम्पियन्स ट्राॅफीतून पत्ता कट
वनडे क्रिकेटमध्ये ‘या’ 3 संघांनी झळकावली सर्वाधिक शतके! पहिल्या स्थानी कोण?
यूपीचा खराब खेळ, 9 षटकांत 80 धावांवरून 142 धावांपर्यंत मजल; 7 खेळाडूंची निराशा
Comments are closed.