वन्यजीवतज्ञ म्हणतात, अतिउष्णतेमुळे वाघ आक्रमक; पशुवैद्यकीय डॉक्टरांनी दिले वैज्ञानिक स्पष्टीकरण
वाघ-मानव संघर्षामागे केवळ ‘नरभक्षक’ प्रवृत्ती नसून तीव्र उष्णतेमुळे वाघांच्या शरीर आणि वर्तनावर होणारे परिणाम कारणीभूत असल्याचे मत वन्यजीवतज्ञांनी व्यक्त केले आहे. उन्हाळ्यात विदर्भाचे तापमान हे 45 ते 47 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत असल्याने वाघांमध्ये ‘हायपरथर्मिया’ अर्थात अतिउष्णतेमुळे निर्माण होणारा ताण वाढत असून त्यातून आक्रमक वर्तनाच्या घटना घडत असल्याचे सांगितले जात आहे.
सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाहीच्या जंगलात वाघिणीने चार महिलांना ठार केल्याच्या घटनेनंतर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी यासंदर्भात वैज्ञानिक स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या मते, वाघ हे ‘होमियोथर्मिक’ प्राणी असल्याने शरीराचे अंतर्गत तापमान स्थिर ठेवणे त्यांच्यासाठी अत्यावश्यक असते. तापमान हे अतिशय वाढल्यास वाघांच्या शरीरातील उष्णता बाहेर टाकण्याची क्षमता कमी होते आणि ‘हायपरथर्मिया’ निर्माण होतो. यामुळे मध्यवर्ती मज्जासंस्थेवर ताण येऊन शरीरात ‘कॉर्टिसोल’ आणि ‘अॅड्रेनालिन’सारख्या तणाव निर्माण करणाऱ्या हार्मोन्सचे प्रमाण वाढल्याने वाघ चिडचिडे, आक्रमक बनतात.
वाघ उन्हापासून बचावासाठी ज्या ओढे, सावलीचे भाग किंवा घनदाट जंगल परिसरात आश्रय घेतात, त्याच भागात तेंदूपत्ता मोठ्या प्रमाणावर आढळतो. त्यामुळे मानव आणि वाघ यांचा थेट संपर्क वाढत असल्याचे निरीक्षण आहे.
तेंदूपत्ता गोळा करताना महिला आणि मजूर खाली वाकून काम करतात. वाघाची दृष्टी हालचाली आणि आकृतीवर आधारित असल्याने वाकलेली मानवी आकृती ही चारपायी प्राण्यासारखी भासू शकते. आधीच उष्णतेमुळे तणावाखाली असलेला वाघ अशा परिस्थितीत तत्काळ हल्ला करण्याची शक्यता वाढते, असेही डॉ. खोब्रागडे यांनी स्पष्ट केले.
Comments are closed.