24 ठिकाणांसाठी संपूर्ण मतमोजणी पुढे ढकलणे अयोग्य, निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींवर फडणवीसांची नाराजी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात निर्माण झालेल्या गोंधळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जवळपास 25 ते 30 वर्षे निवडणुकांची प्रक्रिया पाहिली, मात्र घोषित निवडणुका आणि त्यांचे निकाल पुढे ढकलले जाण्याची घटना प्रथमच पाहायला मिळत असल्याचे फडणवीस म्हणाले.

फडणवीस म्हणाले, “उमेदवार महिनोन्‌महिने प्रचार करतात, मेहनत करतात. त्यांच्या काही चुकीशिवाय सिस्टीमच्या फेलिअरमुळे संपूर्ण प्रक्रिया पुढे ढकलली जाणे योग्य नाही. खंडपीठ आणि निवडणूक आयोग स्वायत्त असले तरी, केलेले इंटरप्रिटेशन चुकीचे आहे असे मला वाटते. आम्ही अनेक वर्ष या निवडणुका लढवल्या आहेत, कायदे पाहिले आहेत. माझ्या मते याचे चुकीचे अर्थ लावले गेले आहेत.”

ते पुढे म्हणाले की, केवळ 24 ठिकाणांच्या तक्रारींसाठी 284 ठिकाणांतील संपूर्ण मतमोजणी थांबविणे उचित नाही, असा त्यांचा ठाम मत आहे. “ज्या ठिकाणी सर्व नियम पाळले गेले आहेत, तिथे एखाद्या व्यक्तीने कोर्टात गेल्यामुळे संपूर्ण मतमोजणी पुढे ढकलणे कोणत्याही तत्त्वात बसत नाही. हे चुकीचे घडले आहे,” अशी टीका त्यांनी केली.

तथापि, या विषयावर पुढे अधिक भाष्य न करण्याचा निर्णय घेत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “माझी नाराजी निवडणूक आयोगावर नाही, पण कायदेशीर प्रक्रियेत होत असलेल्या त्रुटींवर आहे,” असे ते म्हणाले. लोकशाही टिकून राहण्यासाठी लोकप्रतिनिधींनी निवडणुकांच्या काळात योग्य संदेश द्यावा आणि जबाबदारीने वर्तन करावे, अशीही सूचना फडणवीसांनी केली.

Comments are closed.