Ratnagiri News – उन्हाळी सुट्टीनंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू; एसटी, रेल्वेला मोठी गर्दी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

संगमेश्वर तालुक्याच्या विविध भागात उन्हाळी सुट्टीनिमित्त गावाकडे आलेले चाकरमानी आता पुन्हा मुंबई, पुण्यासह अन्य शहरांकडे परतीच्या प्रवासाला लागले आहेत. येत्या काही दिवसांत शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची तयारी, शालेय साहित्य व गणवेश खरेदीसाठी चाकरमान्यांनी परतीचा मार्ग धरला आहे. त्यामुळे एसटी, रेल्वे तसेच खासगी आराम गाड्यांची आरक्षणे सध्या ‘फुल्ल’ झाली आहेत.

दहावी-बारावी तसेच इतर शालेय परीक्षा संपल्यानंतर टप्प्याटप्प्याने चाकरमानी गावाकडे दाखल झाले होते. काहीजण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करून तर काही खासगी वाहनांनी गावी आले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांत तालुक्यात चाकरमान्यांची मोठी रेलचेल पाहायला मिळत होती. गावागावात मुंबई-पुणे नंबरच्या गाड्या फिरताना दिसत होत्या. विवाहसोहळे,धार्मिक कार्यक्रम आणि कौटुंबिक समारंभांच्या निमित्तानेही अनेकांनी आधीच नियोजन करून गावी हजेरी लावली होती.

मात्र,यंदाच्या वाढत्या उकाड्यामुळे आणि तीव्र पाणीटंचाईमुळे चाकरमान्यांना अनेक ठिकाणी त्रास सहन करावा लागला. अजूनही तालुक्यात मान्सूनपूर्व समाधान कारक पाऊस झालेला नाही. किनारी भागात हलक्या सरी कोसळल्या असल्या तरी पाणीटंचाई दूर होईल एवढा पाऊस झालेला नाही. त्यामुळे गावागावांत नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

दरम्यान, शाळा सुरू होण्यास अवघे काही दिवस उरल्याने परतीच्या प्रवासासाठी मोठी गर्दी होत आहे. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता एसटी आगाराकडून नियमित फेऱ्यांसोबत काही जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. तरीही बहुतांश गाड्यांची आरक्षणे पूर्ण भरली आहेत. आरक्षण न मिळालेल्या अनेक चाकरमान्यांनी पुणे मार्गे अथवा रेल्वेने मुंबई गाठण्याचा पर्याय निवडला आहे. काहीजण खासगी आराम गाड्यांचा आधार घेत आहेत.मान्सून आता केव्हाही दाखल होण्याची शक्यता असल्याने त्यापूर्वीच शहरांकडे परतण्याचे नियोजन चाकरमान्यांनी केल्याचे चित्र सध्या तालुक्यात पाहायला मिळत आहे.

Comments are closed.