घटक पक्षांमुळे बोडोलँडमध्ये भाजपासमोर गोंधळ

युपीपीएल अन् बीपीएफ यापैकी एकाची निवड करावी लागणार

वृत्तसंस्था/ कोक्राझार

आसामच्या बोडोलँड सहाव्या अनुसूचीत क्षेत्रात भाजपसमोर गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या संभाव्य परिषदेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा भाजपने यापूर्वीच केली आहे. भाजप सध्या क्षेत्रीय पक्ष युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल (युपीपीएल)सोबत आघाडी करत परिषदेच्या सत्तेवर आहे. तर सध्या परिषदेत युपीपीएलचे वर्चस्व आहे. तर दुसरीकडे परिषदेतील विरोधी पक्ष बोडोलँड पीपल्स फ्रंट (बीपीएफ) आसाम विधानसभेत रालोआ सरकारचा सहकारी आहे. आता सत्ता समीकरणे बदलल्याने भाजप स्वबळावर तर युपीपीएल आणि बीपीएफ परस्परांमध्ये आघाडी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

आसाममध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीपूर्वी बोडोलँड प्रादेशिक क्षेत्राच्या (बीटीआर) 40 जागांवर होणारी ही अखेरची स्थानिक निवडणूक आहे. अशा स्थितीत सर्व पक्ष यात स्वत:चे वर्चस्व कायम राखू इच्छितात. आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा हे मागील काही काळापासून बोडोलँडमध्ये सातत्याने सभा घेत आहेत. या क्षेत्रातील लोकांची नाडी जाणून घेत असून बीटीआरमध्ये शांतता प्रस्थापित करणे भाजप सरकारचे सर्वात मोठे यश आहे. दिल्ली आणि दिसपूरमध्ये भाजप सरकार आल्यापासून गोळ्यांद्वारे एकाही इसमाचा मृत्यू झाला नसल्याचा दावा हेमंत विश्व शर्मा यांनी केला आहे.

यापूर्वी 2020 मध्ये झालेल्या बीटीआर निवडणुकीत कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. तेव्हा बीपीएफ 17 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. परंतु भाजप आणि युपीपीएलने गण सुरक्षा पक्षासोबत आघाडी करत बीटीआरमध्ये सत्ता मिळविली होती. येथे काँग्रेसचा एक सदस्य निवडून आला होता, परंतु त्याने नंतर भाजपमध्ये प्रवेश केला होता.

Comments are closed.