महायुतीला मतभेदांचा निवडणुकीत फटका बसण्याची भीती, तोडग्यासाठी तीन मंत्र्यांची समन्वय समिती

भाजप, शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन मंत्री समन्वयक म्हणून काम करणार असून महायुतीमधील मतभेदांचा फटका बसू नये म्हणून भाजप शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन मंत्र्यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय आज भाजपच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपच्या महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या जिल्हा प्रभारींची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाची घोषणा केली.

महायुतीत समन्वय टिकवण्यासाठी प्रयत्न केले जातील. या समन्वयासाठी प्रत्येक जिह्यात तीन मंत्र्यांची समिती असेल. यामध्ये एक भाजप, एक शिवसेना आणि एक राष्ट्रवादी असे तीन मंत्री समन्वयक म्हणून काम करणार आहेत. महायुतीतील मित्रपक्षांमध्ये कुठेही मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी भाजप घेईल, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

मित्रपक्षांवर टीका नको, फडणवीसांनी टोचले कान

तब्बल तीन तास राज्यातील सर्व निवडणुकांचे विभागनिहाय सादरीकरण बैठकीत करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रभारी यांना जास्तीत जास्त महायुतीवर भर देण्याच्या, मित्रपक्षांवर टीकाटिप्पणी न करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.

मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील नवे प्रभारी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रवींद्र चव्हाण यांच्यात सध्या सख्य नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या प्रभारी पदाची सूत्रे रवींद्र चव्हाण यांच्याकडे सोपवण्याऐवजी मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोपवण्यात आल्याचे सांगण्यात येते.

Comments are closed.