पुणे पोलिसांनी भोरमधून दत्तात्रय गाडेच्या मैत्रिणीला बोलावलं, नराधमाचा सगळा कच्चाचिठ्ठा उघड

पुणे: पुण्यातील स्वारगेट एसटी आगारात एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार करणारा नराधम दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) याचा पुणे पोलिसांकडून सध्या कसून शोध घेतला जात आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तपासाची सूत्रे हातात घेतली आहेत. कालपर्यंत पुणे पोलिसांची (Pune Police) आठ पथके दत्तात्रय गाडे याचा शोध घेत होती. मात्र, आता या पथकांची संख्या 13 पर्यंत वाढवण्यात आली आहे. दत्तात्रय गाडे लपण्यासाठी कुठे जाऊन शकतो, या सर्व शक्यता विचारात घेऊन पुणे पोलिसांची ही पथकडे चारही बाजूंना रवाना करण्यात आली आहेत. (Pune Rape case)

गुन्हे शाखेने बुधवारी दत्तात्रय गाडे याच्या मित्र-मैत्रिणींची चौकशी केली. गाडे याच्या एका मैत्रिणीला भोरवरुन चौकशीसाठी पुण्यात आणण्यात आले. त्यावेळी तिने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली. दत्तात्रय गाडे मला सारखे फोन करायचा आणि मेसेज करायचा. या दोघांची आणखी एक मैत्रीण होती. तिच्याशी पॅचअप करुन दे किंवा तिची भेट घालून दे, असा धोशा दत्तात्रय गाडेने माझ्याकडे लावला होता. तो यासाठी मला सतत फोन करुन त्रास द्यायचा, असे या गाडेच्या मैत्रिणीने सांगितले. त्यामुळे दत्तात्रय गाडेने महिलेवर अत्याचार केल्याची ही पहिलीच घटना नसावी, यापूर्वीही त्याने महिलांना त्रास दिला असावा, असा संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीने पोलीस आता तपास करत आहेत. गुन्हे शाखेने बुधवारी रात्रीपर्यंत दत्तात्रय गाडे याच्या 10 मित्र-मैत्रिणींची चौकशी केली. या सगळ्यांकडून दत्तात्रय गाडे याच्याबद्दल खडानखडा माहिती पोलिसांनी काढून घेतली आहे. दत्तात्रय गाडे हा मूळचा शिरुरचा होता. पोलिसांनी शिरुरमधील त्याच्या घरी बंदोबस्त लावला आहे. याशिवाय, दत्तात्रय गाडे याच्या आई-वडिलांना आणि भावाला पोलिसांनी चौकशीसाठी पुण्यात बोलावून घेतले आहे. त्यामुळे आता दत्तात्रय गाडे पोलिसांच्या ताब्यात कधी सापडणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

दत्तात्रय गाडे याने मंगळवारी पहाटे स्वारगेट डेपोच्या आवारात उभ्या असणाऱ्या तरुणीला भुलवून एका शिवशाही बसमध्ये नेले होते. ही तरुणी बसमध्ये चढल्यानंतर दत्तात्रय गाडे याने दार बंद करुन घेतले आणि तिच्यावर अत्याचार केले होते. दत्तात्रय गाडे याने एकवेळा नव्हे तर दोनवेळा तरुणीवर बलात्कार केला. ससून रुग्णालयाने पुणे पोलिसांना सुपूर्द केलेल्या तरुणीच्या वैद्यकीय तपासणी अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे. पीडित तरुणी ही पुण्यात परिचारिका म्हणून काम करत होती. ती मंगळवारी फलटणमधील आपल्या गावी जाण्यासाठी निघाली होती. या 26 वर्षांच्या तरुणीवर झालेल्या अत्याचारामुळे पुण्यासह राज्यभरात संतप्त पडसाद उमटत आहेत.

https://www.youtube.com/watch?v=27dsdnpmc0g

आणखी वाचा

स्वारगेट बस डेपोत तरुणीवर एकदा नव्हे दोनवेळा अत्याचार, मेडिकल रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती उघड

अधिक पाहा..

Comments are closed.