धडक 2’साठी मिळालेला पुरस्कार दिवंगत सक्षम ताटेला समर्पित! अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीची पोस्ट व्हायरल

नुकतीच एन्टरटेंम्नेंट अवॉर्डची (India Entertainment Awards 2025) घोषणा झाली. यावेळी अनेक बॉलीवूड कलाकारांना पुरस्कार मिळाले. मात्र यामध्ये लक्ष वेधून घेतसे ते अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीने. ‘धडक २’ या चित्रपटासाठी सिद्धांत चतुर्वेदीला पॉवर पॅक्ड परफॉर्मर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मात्र हा पुरस्कार स्विकारून त्याने नांदेडमध्ये जातीय विखारातून बळी ठरलेल्या दिवंगत सक्षम ताटेला हा समर्पित केला आहे. त्याच्या या निर्णयाचे कौतुक केले जात आहे.
अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीला पॉवर पॅक्ड परफॉर्मर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळताच त्याने मंचावर सर्वांचे आभार मानले. आणि सक्षम ताटेला श्रद्धांजली अर्पण करत अत्यंत संवेदनशील मेसेज दिला आहे. सक्षम ताटेच्या कुटुंबासाठी आणि त्याची प्रेयसी आंचल हिच्यासाठी सहानुभूती व्यक्त करत, सिद्धांतने ही पोस्ट लिहिली. “हा पुरस्कार मी दिवंगत सक्षम ताटेला समर्पित करत आहे, ज्याला आंतरजातीय ऑनर किलिंगच्या आणखी एका प्रकरणात आपले प्राण गमवावे लागले, असे तो म्हणाला.
हा पुरस्कार फक्त माझा नाही.ज्यांना जातीय व्यवस्थेत अपमान सहन करावा लागला, भेदभाव सहन करावा लागला, ज्यांना बहिष्कृत करण्यात आलं होतं, हा पुरस्कार त्यांच्यासाठी आहे. परिस्थिती प्रतिकूल असूनही त्यांनी ठामपणे आपली बाजू मांडली. त्यांच्या याच जिद्दीला सलाम आहे. त्यामुळे हा पुरस्कार मी दिवंगत सक्षम ताटेला समर्पित करतो, असो तो यावेळी म्हणाला.
दरम्यान सिद्धांतनी ‘धडक 2’च्या दिग्दर्शिका शाझिया इकबाल यांचेही आभार मानले. तसेच ‘धडक 2’सारख्या कथा धैर्याने, धाडसाने, संवेदनशीलतेने आणि प्रामाणिकपणाने सांगितल्या जात राहायला हव्यात, असे मतही यावेळी त्यांने व्यक्त केले.

Comments are closed.