सातबारा दाखवा आणि डिझेल न्या! वाशिममध्ये इंधनासाठी पेट्रोल पंपांवर नागरिकांची झुंबड

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

गेल्या आठ दिवसात एका बाजूला पेट्रोल आणि डिझेलची तीन वेळा दरवाढ झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला राज्यातील अनेक भागात पुन्हा एकदा इंधन टंचाई जाणवू लागली आहे. मराठवाड्यात याचे प्रमाण जास्ती आहे. बुलढाणा, हिंगोली इथे सुरू असलेली इंधन टंचाईची दृश्ये सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहेत. आता चर्चा सुरू आहे ती वाशिम इंधन टचाई आणि त्यावर काढलेल्या अजब गजब उताऱ्याची. वाशिम येथे पंपांवर डिझेल मिळवण्यासाठी ग्राहकांना थेट सातबारा उतारा किंवा अधिकृत ओळखपत्र दाखवणे सक्तीचे करण्यात येत असल्याचे वृत्त आहे.

इंधनाच्या वाढत्या मागणीमुळे आणि संभाव्य साठेबाजीला आळा घालण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालकांनी ही कठोर भूमिका घेतली आहे, असे बोलले जात आहे. शेतीच्या कामांसाठी किंवा इतर कारणांसाठी डिझेल घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकाने सातबारा उतारा किंवा इतर कोणतेही अधिकृत ओळखपत्र दाखवल्याशिवाय त्यांना पंपावरून डिझेल दिले जात नाहीये. यामुळे इंधन भरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना आता स्वतःची ओळख पटवून देण्यासाठी कागदपत्रे सोबत बाळगणे अनिवार्य झाले आहे.

दुसरीकडे राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही इंधनासाठी अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलचा साठा करून ठेवण्यासाठी अनेक नागरिक थेट हातात कॅन, मोठे ड्रम आणि बाटल्या घेऊन पेट्रोल पंपांवर धाव घेत आहेत. अनेक शहरांमध्ये पेट्रोल पंपांच्या बाहेर वाहनांच्या दोन ते तीन किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सध्याच्या कडक आणि रणरणत्या उन्हाची कोणतीही पर्वा न करता नागरिक तासन्‌तास रांगेत उभे राहून इंधन मिळवण्यासाठी प्रतीक्षा करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Comments are closed.