अजित पवारांनी सांगितलं बिहारमध्ये NDA च्या विजयाचं राज’कारण’; मोदी अन् नितीशकुमारांचं अभिनंदन
मुंबई : देशाचं लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालात एनडीए आघाडीला मोठं यश मिळालं आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांप्रमाणेच बिहारचे निकाल लागल्याचं दिसून येत आहे. बिहारमध्ये भाजप-जेडीयू आघाडीला 200 पेक्षा जास्त जागांवर विजयी आघाडी मिळत आहे. तर, काँग्रेस-राजद महाआघाडी केवळ 39 जागांवर विजयी आघाडी सध्या दिसून येत आहे. त्यामुळे, विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप एनडीला मोठं यश मिळाल्याने महाराष्ट्रात महायुतीचे समर्थक, नेते आणि कार्यकर्ते आनंद व्यक्त करत आहेत. राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनीही या विजयानंतर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, बिहारमधील जनतेने डबल इंजिन सरकारला पुन्हा एकदा भरघोस कौल दिला आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल बिहारमधील एनडीएच्या सर्व घटक पक्षांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.”, असेही त्यांनी म्हटले.
बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) मिळविलेला विजय हा ऐतिहासिक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावरील जनतेच्या दृढविश्वासाचे ते प्रतीक आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, ”बिहारमध्ये एनडीएच्या सरकारने समाज कल्याणाच्या अनेक क्रांतिकारक योजना राबवल्या. तेथील लाडक्या बहिणींचेसुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणात आशीर्वाद लाभले, त्याचंच हे यश आहे. बिहारमधील जनतेने डबल इंजिन सरकारला पुन्हा एकदा भरघोस कौल दिला आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल बिहारमधील एनडीएच्या सर्व घटक पक्षांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.”, असे अजित पवार यांनी म्हटले.
राज्याला नवी दिशा मिळेल
“हा विजय केवळ संख्याबळाचा नसून विकास, चांगले प्रशासन आणि सामाजिक न्यायाच्या धोरणाचा विजय आहे. एनडीएच्या एकजुटीचा विजय आहे.त्यामुळे बिहारच्या सर्वांगीण विकासाला आणखी गती देईल आणि राज्याला नवी दिशा मिळेल. पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि रोजगार निर्मितीच्या क्षेत्रात बिहार आणखी झपाट्याने पुढे जाईल,” असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला.
अजित पवारांच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या एकाही उमेदवाराला जिंकणे तर सोडा पण आघाडीही घेता आलेली नाही. बिहारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने उभा केलेल्या 15 पैकी 13 जागांवर अजित पवारांच्या पक्षाचे उमेदवार मोठ्या फरकाने पिछाडीवर आहेत. अजित पवारांच्या या उमेदवारांना मतंही खूप कमी पडली आहेत. बिहारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा राष्ट्रीय पक्ष बनवण्याच्या महत्त्वाकांक्षेला सुरुंग लागणार आहे.
शिंदेंच्या सभा, दोन्ही उमेदवार विजयी
शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या होत्या. शिंदे यांनी पूर्व चंपारण्यमधील गोविंदगंज मतदार संघात लोक जनशक्ती पार्टीचे उमेदवार राजू तिवारी यांच्यासाठी प्रचार सभा घेतली, त्या राजू तिवारी यांचा विजय जवळपास नक्की असून ते 16 हजार मतांनी पुढे आहेत. तर, कल्याणपूर मतदार संघातही भाजप उमेदवार सचिंद्र प्रसाद सिंग यांच्यासाठीही एकनाथ शिंदेंनी प्रचार सभा घेतली होती. या निकालांचे कल पाहता भाजप उमेदवार सचिंद्र प्रसाद सिंग 5 हजार मतांनी आघाडीवर असून त्यांचाही विजय जवळपास नक्की असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा
बिहारमध्ये भाजपच मोठा भाऊ, नितीश कुमारांच्या JDU ला किती जागा? गत निवडणुकीच्या तुलनेत मोठं यश
आणखी वाचा
Comments are closed.