एच1-बी व्हिसा बंद व्हायला नको, अमेरिकेच्या विकासात हिंदुस्थानींचे योगदान

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एच1-बी व्हिसा पॉलिसीमुळे व्हिसा शुल्क अनेक पटीने वाढले आहे. याचा मोठा फटका हिंदुस्थानींना बसला आहे. ट्रम्प यांच्या या कडक धोरणाच्या पार्श्वभूमीवर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी हिंदुस्थानींची जोरदार प्रशंसा केली आहे. अमेरिकेच्या विकासात हिंदुस्थानी नागरिकांचे योगदान असल्याचे मस्क यांनी म्हटले. तसेच एच1-बी व्हिसा पॉलिसी बंद होता कामा नये, असे वक्तव्यही त्यांनी केले.

इलॉन मस्क यांनी हिंदुस्थानचे तरुण व्यावसायिक, झिरोधाचे सहसंस्थापक निखिल कामथ यांच्या पॉडकास्टमध्ये सहभाग घेतला होता. या मुलाखतीत मस्क यांनी हिंदुस्थान आणि अमेरिकेमध्ये निर्माण झालेला तणाव, एच-1बी व्हिसावरील निर्बंध अशा अनेक मुद्दय़ांवर भाष्य केले. हिंदुस्थानच्या प्रतिभावान कर्मचाऱयांमुळे अमेरिकेला लाभ झाला आहे, हे मस्क यांनी मान्य केले. मस्क म्हणाले, हिंदुस्थानी इंजिनीअर्स, शास्त्रज्ञ, उद्योजकांनी अमेरिकेच्या तंत्रज्ञान आणि व्यवसाय वाढीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

माझी पत्नी अर्धी हिंदुस्थानी

माझी पत्नी शिवोन जिलिस अर्धी हिंदुस्थानी असून मुलाचे नावही नोबेल विजेते खगोल भौतिकशास्त्रज्ञ सुब्रह्मण्यम चंद्रशेखर यांच्या नावावरून ठेवल्याचे टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ इलॉन मस्क म्हणाले.

Comments are closed.