नाईटक्लब, मध्यरात्र अन् पुन्हा इंग्लंडचा कर्णधार; लॉर्ड्समधील विजयानंतर इंग्लंड क्रिकेटमध्ये खळ
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स बातम्या: लॉर्ड्स कसोटीत मिळालेल्या विजयाचा आनंद इंग्लंड संघ साजरा करत असतानाच नवा वाद पेटला आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज गस अॅटकिन्सन हे उशिरापर्यंत एका नाईटक्लबमध्ये होते, अशी माहिती समोर आल्यानंतर इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. संघाच्या प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्याचा संशय व्यक्त करत बोर्डाने दोन्ही खेळाडूंविरोधात चौकशी सुरू केली असून संपूर्ण प्रकरण स्वतंत्र क्रिकेट नियामकाकडे सोपवण्यात आले आहे.
आगामी कसोटी मालिकेवर परिणाम होण्याची शक्यता
या वादाचा थेट परिणाम न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या आगामी कसोटी मालिकेवर होऊ शकतो. चौकशी पूर्ण होईपर्यंत दुसऱ्या कसोटीसाठी संघाची घोषणा पुढे ढकलण्यात आल्याचे ECB ने स्पष्ट केले आहे. स्टोक्स आणि अॅटकिन्सन यांनी संघाच्या शिस्तभंगाशी संबंधित नियमांचे उल्लंघन केले आहे का, याचा सध्या तपास सुरू आहे. जर चौकशीत दोघांवरही कारवाईची वेळ आली, तर दुसऱ्या कसोटीपूर्वी इंग्लंडला मोठा धक्का बसू शकतो. विशेषतः कर्णधार स्टोक्स आणि प्रमुख वेगवान गोलंदाज अॅटकिन्सन यांची अनुपस्थिती संघासाठी चिंतेची बाब ठरू शकते.
नाईटक्लबमध्ये नेमकं काय घडलं?
ECB च्या अधिकृत निवेदनानुसार, न्यूझीलंडविरुद्धची पहिली कसोटी संपल्यानंतर सोमवारी पहाटे बेन स्टोक्स आणि गस अॅटकिन्सन एका नाईटक्लबमध्ये होते. याच ठिकाणी कथित वादग्रस्त घटना घडल्याचे सांगितले जात आहे. घटनेबाबत अद्याप सर्व तपशील सार्वजनिक करण्यात आलेले नाहीत. कोणताही कायदा मोडला गेला आहे का, याबाबतही स्पष्टता नाही. मात्र संघाच्या कर्फ्यू नियमांचे किंवा नाईटक्लबच्या नियमांचे उल्लंघन झाले असल्यास ECB कठोर भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.
इंग्लिश क्रिकेटमध्ये ऑफ-फिल्ड वाद जुने
इंग्लंड क्रिकेटमध्ये मैदानाबाहेरील वादांची ही पहिली घटना नाही. गेल्या काही वर्षांत खेळाडूंच्या वर्तनामुळे बोर्डाला अनेकदा अडचणींचा सामना करावा लागला आहे. काही काळापूर्वीच अॅशेस मालिकेपूर्वी मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार हॅरी ब्रूक न्यूझीलंडमधील वेलिंग्टन येथे एका नाईटक्लबमध्ये वादात अडकला होता. त्यावेळी एका बाऊन्सरने त्याला मारहाण केल्याची घटना समोर आली होती. त्या वेळी जेकब बेथेल आणि जोश टंग हेही त्याच्यासोबत होते. या घटनेनंतर ECB ला खेळाडूंवर मध्यरात्रीनंतर बाहेर जाण्यासंबंधी कडक निर्बंध आणि कर्फ्यू लागू करावा लागला होता.
स्टोक्सचा वादांशी जुना संबंध
बेन स्टोक्ससाठी हा प्रकार विशेषतः अस्वस्थ करणारा ठरू शकतो, कारण याआधीही तो अशाच एका मोठ्या वादात अडकला होता. 2017 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सामन्यानंतर ब्रिस्टलमधील एका नाईटक्लबबाहेर झालेल्या रस्त्यावरील भांडणप्रकरणी स्टोक्सला अटक करण्यात आली होती. त्या घटनेमुळे त्याच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते आणि इंग्लंड क्रिकेटलाही मोठी नामुष्की सहन करावी लागली होती. आता पुन्हा एकदा नाईटक्लबशी संबंधित वादात त्याचे नाव समोर आल्याने इंग्लंड संघासह क्रिकेटविश्वातही चर्चा रंगल्या आहेत.
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला
Comments are closed.