भूसंपादन कार्यालयासमोर शेतकऱ्याचा जीवन संपवण्याचा प्रयत्न, हातकणंगलेतील घटना; शेतकऱ्यांनी कार्यालयासमोर केला ‘तेरावा’

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील चोकाक ते अंकली या मार्गावरील चौपट मोबदल्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनास वेगळेच वळण लागले. हातकणंगले येथील भूसंपादन कार्यालयासमोर अतिग्रे येथील विजय पाटोळे या बाधित शेतकऱयाने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला. त्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी भूसंपादन कार्यालयाला टाळे ठोकले.

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील चोकाक ते अंकलीदरम्यान असलेल्या बाधित शेतकऱ्यांवर सतत अन्याय होत असून, याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासन डोळेझाक करत आहे. वर्षानुवर्षे येरझाऱया घालून न्याय मिळत नसेल तर ही सर्व व्यवस्था मृत झाल्याची भावना झाल्याने हातकणंगले येथे भूमी अभिलेख कार्यालयासमोर भागातील राष्ट्रीय महामार्ग अन्याय निवारण समिती अंतर्गत सर्व शेतकऱ्यांनी तेराव्याचा विधी घालून निषेध व्यक्त केला. यावेळी चौपट भरपाईचा निर्णय झाल्याशिवाय आम्ही मोजणीला हात लावू देणार नाही, असा इशारा कृती समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील यांनी दिला.

हातकणंगले तालुक्यातील चोकाक, अतिग्रे, माणगाववाडी, हातकणंगले, मजले या गावांतील महामार्गासाठी जमिनी मोजण्याच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी हातकणंगले येथील भूमी अभिलेख कार्यालयात ठिय्या मारला. पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी हे आंदोलन थांबवण्याची विनंती केली. मात्र, मोजणीचे काम थांबेपर्यंत उठणार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली.

यावेळी डॉ. अभिजीत इंगवले, सुरेश खोत, किरण जामदार, अमित पाटील, दीपक वाडकर, अविनाश कोडोले, सुधाकर पाटील, मिलिंद चौगुले, प्रतीक मुसळे, शिलवंत बिडकर, आनंदा पाटील, जयकुमार दुघे, सचिन मगदूम, अजित रणनवरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Comments are closed.