राजुरी येथे सैन्याच्या वाहनावर गोळीबार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय सेनेच्या वाहनावर जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात कोणतीही जीवीत हानी झाल्याचे वृत्त नाही. ही घटना बुधवारी सुंदरबनी विभागातील फाई या खेड्यात घडल्याची माहिती देण्यात आली आहे. सैनिकांनीही प्रत्युत्तरादाखल जोरदार गोळीबार केला.
या घटनेनंतर या संपूर्ण भागाची नाकेबंदी करण्यात आली असून गस्त वाढविण्यात आली आहे. तसेच या भागात सैनिकांची संख्याही या घटनेनंतर वाढविण्यात आली आहे. गोळीबार करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यास प्रारंभ करण्यात आला असून सर्व बाजूंनी या भागाची कोंडी करण्यात आली आहे.
पहाटे हल्ला
बुधवारी पहाटेच्या वेळैला हा हल्ला करण्यात आला. सीमेपलिकडे प्रशिक्षित झालेल्या दहशतवाद्यांनी तो केलेला असावा, असे प्रथमदर्शनी दिसून येते. तथापि, गोळीबार करणाऱ्यांना लवकरच पकडण्यात येईल, असा विश्वास सेनेच्या प्रवक्त्याने व्यक्त केला आहे. गेल्या वर्षीच्या मे महिन्यापासून दहशतवादी हल्ल्यांमध्ये काशीही वाढ झाल्याचे दिसून येत असली तरी सेना सतर्क असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
पंजाब सीमेवर घुसखोर ठार
पंजाब राज्याच्या पठाणकोट भागातील तापपाटण येथील सीमाचौकीच्या प्रदेशात सीमा सुरक्ष दलाने एका घुसखोराला कंठस्नान घातले आहे. बुधवारी पहाटेच्या आधी ही घटना घडली आहे. चौकीतील सैनिकांना सीमा प्रदेशात काही संशयास्पद हालचाल आढळली. त्यांनी चौकशी केली असता, एक घुसखोर पाकिस्तानमधून भारतात प्रवेश करत असल्याचे दिसून आले. त्याला थांबविण्याचा आणि पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला. तथापि, त्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात तो ठार झाला.
सीमेवर अतिरिक्त तुकड्या
गेल्या तीन महिन्यांमध्ये घुसखोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे जम्मू-काश्मीर सीमेच्या अनेक भागांमध्ये गस्त आणि सैनिकांची संख्या वाढविण्यात आली आहे. भारतीय सेनेने दहशतवाद्यांच्या विरोधात धडक अभियान चालविले आहे. अनेक दहशतवाद्यांना यमसदनी पाठविण्यात आले आहे. ‘दहशतवादाविरोधात शून्य सहनशक्ती’ हे अभियान चालविण्यात येत आहे. सरकारने या कामी सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे दहशतवादाला आळा घालण्यात यश आले असून या भागातील दहशतवादाचा पूर्ण नि:पात होईपर्यंत अभियान चालविण्यात येणार आहे.
Comments are closed.