लग्नसराईच्या तोंडावर सोन्याच्या दरात चढउतार कायम! आठवड्याभरात 4 हजारांची वाढ, आज तोळ्यामागे भाव


सोन्या-चांदीचे आजचे भाव: सोने बाजारात गेल्या काही महिन्यांपासून लक्षणीय चढ उतार पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात 1 लाख 20 हजार 690 रुपयांवर असणार सोनं आज 1 लाख 24 हजार 70 रुपयांवर पोहोचलं आहे. तर किलो मागे चांदीचा दर आज 1 लाख 55 हजार 610 रुपयांवर पोहोचलाय . जागतिक शेअर बाजारातील अस्थिरता, डॉलरच्या किमतीतील बदल आणि आंतरराष्ट्रीय राजकीय तणावामुळे गुंतवणूकदारांमध्ये सुरक्षित गुंतवणुकीकडे वळण्याची प्रवृत्ती वाढली आहे. त्याचा थेट परिणाम सोन्याच्या किमतींवर होत असून देशांतर्गत बाजारात सोन्याचा भाव झपाट्याने वाढताना दिसतोय. (gold rates)

सोने-चांदी दरात मोठी वाढ

सकाळी 11.30 वाजता सोन्याचे दर  प्रति 10 ग्रॅम ₹1,24,230 वर होते. त्याचवेळी चांदी जवळपास प्रति किलो ₹1,55, 610 वर पोहोचलीय. मुंबईतील सराफा बाजारात, 24 कॅरेट सोन्याची प्रति दहा ग्रॅम किंमत ही 1 लाख 24 हजार 230 रुपये एवढी झाली आहे. तोळ्यामागे सोन्याचा दर  1 लाख 44 हजार 900 रुपये आहे. 22 कॅरेट सोनं 1 लाख 32 हजार 825 रुपयांवर पोहोचले असून किलोमागे चांदीचा दर एक लाख 56 हजार 010 रुपयांवर पोहोचलाय.

सोन्यात चढउतार कशामुळे ?

– देशांतर्गत बाजारात लग्नसराई व सणासुदीचे वातावरण कायम असल्याने दागिन्यांची मागणी वाढलेली दिसते.

– ऑक्टोबरमध्ये विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर सोन्याच्या किमतीत घसरण झाली होती. पण अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेविषयी वाढत्या चिंतेमुळे आणि यूएस फेडकडून डिसेंबरमध्ये व्याजदर कपात होण्याची शक्यता असल्याने सोन्याला पुन्हा झळाळी आलीय.

– जागतिक स्तरावर महागाई नियंत्रणात आणण्यासाठी अमेरिका व युरोपमधील अनेक देश व्याजदरात बदल करण्याच्या हालचाली करत आहेत त्यामुळे चलन बाजारात अस्थिरता निर्माण झाली असून सोने सुरक्षित पर्याय असल्यामुळे त्याची खरेदी वाढली आहे.

गुंतवणूकदारांना काय करायला हवं?

बाजार जाणकारांच्या मते जागतिक अनिश्चितता आणि लग्नसराईमुळं येत्या काळात सोने आणि चांदीची मागणी वाढल्यानं दर आणखी वाढू शकतात. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी हा चांगला पर्याय आहे. मात्र, अल्पकालीन तेजी आणि घसरण लक्षात घेणं आवश्यक आहे. जाणकारांच्या मते खरेदी अगोदर सपोर्ट लेवल आणि बाजाराची दिशा पाहायला पाहिजे. ज्वेलर्सच्या मते लग्नसराई आणि सणांच्या काळात होसलेल मागणी वाढली आहे. ज्यामुळं दरांवर परिणाम पाहायला मिळेल.

सोने आणि चांदीचे दर कसे ठरतात?

सोने आणि चांदीचे दर आंतरराष्ट्रीय घटकांवर अवलंबून असतात. डॉलर- रुपया विनिमय दर म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीचे दर डॉलरमध्ये निश्चित होतात. रुपया कमजोर झाल्यास भारतात सोन्याचे दर वाढतात. भारतात बहुतांश सोने आयात केले जातं. ज्यामध्ये आयात शुल्क, जीएसटी आणि स्थानिक करांचा परिणाम सोन्याच्या दरांवर होतो. भारतात सोन्याची मागणी लग्नसराई किंवा सनांच्या निमित्तानं वाढते. कारण सोन्याला आर्थिकदृष्ट्या जसं महत्त्व आहे, तसंच ते सांस्कृतिकदृष्ट्या देखील आहे. महागाई जेव्हा वाढते किंवा शेअर बाजारात अस्थिरता असते तेव्हा गुंतवणूकदारांकडून सोन्यात सुरक्षित पर्याय म्हणून गुंतवणूक वाढवली जाते. ज्यामुळं सोन्याचे दर वाढतात.

आणखी वाचा

Comments are closed.