IND vs ENG: शुबमन गिलच्या नेतृत्वावर ग्रेग चॅपलची मोठी प्रतिक्रिया, इंग्लंडमध्ये विजयासाठी दिला ‘हा’ खास सल्ला!

भारत-इंग्लंड (IND vs ENG) दोन्ही संघात कसोटी मालिका सुरू आहे. सध्या इंग्लंड मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी आता ऑस्ट्रेलियाचे माजी महान क्रिकेटपटू ग्रेग चॅपल (Greg Chappell On Shubman gill’s Captaincy) यांनी शुबमन गिलच्या नेतृत्वावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी गिलला इंग्लंडमध्ये कसं जिंकता येईल याचा फॉर्म्युला दिला आहे आणि भारत इंग्लंडमध्ये विजय कसा मिळवू शकतो, हेही स्पष्ट केलं आहे.

ग्रेग चॅपल यांनी ईएसपीएन क्रिकइन्फोसाठी एक लेख लिहिला असून त्यात त्यांनी शुबमन गिलच्या नेतृत्वावर आपली मते मांडली आहेत. त्यांनी असं सांगितलं की, कर्णधार फक्त गोलंदाजी किंवा क्षेत्ररक्षणात बदल करत नाही, तर तो संघाची मानसिकताही ठरवतो. चॅपल यांच्या मते, गिलने कठीण वेळेतही आपल्या खेळाडूंना पाठिंबा द्यायला हवा.

त्यांनी पुढे म्हटलं, गिलने हे दाखवायला हवं की, तो भारताला कोणत्या प्रकारच्या संघासारखं सादर करू इच्छितो. कर्णधार केवळ बोलून नाही, तर कृतीतूनही उदाहरण ठेवतो. भारताने कमकुवत क्षेत्ररक्षण करणारा संघ म्हणून राहू नये. सर्वोत्तम संघ खेळपट्टीवर जबरदस्त असतात, ते सहज धावा देत नाहीत आणि झेलही सोडत नाहीत.

चॅपल यांनी असंही सांगितलं की, संवादाच्या बाबतीत गिलने सुधारणा करायला हवी. त्यांनी म्हटलं, महान कर्णधार हे नेहमी चांगले संवाद साधणारे असतात. गिलने लवकरात लवकर त्या प्रकारे व्हायला हवं. मग ते सरावादरम्यान असो, सामन्यादरम्यान असो किंवा ड्रेसिंग रूममध्ये असो. त्याने शांतपणे पण स्पष्टपणे संवाद साधायला हवा. अशा पद्धतीनं संवाद साधावा लागेल, ज्यामुळे संघ एकत्र येईल आणि विश्वास निर्माण होईल.

त्याला योग्य निर्णय घ्यावे लागतील. फलंदाजांना सकारात्मक पद्धतीने खेळण्यासाठी आणि भागीदारीसाठी प्रेरित करावं लागेल. गोलंदाजांना हे समजावून सांगायला हवं की, फक्त विकेट घेणं पुरेसं नाही, तर दबाव टाकणंही महत्त्वाचं आहे, कारण दबाव वाढल्यावरच चुकांची शक्यता असते.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना 23 जुलै 2025 रोजी मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतीय संघ सध्या मालिकेत पिछाडीवर आहे. ही मालिका बरोबरीत आणायची असेल, तर भारताला हा चौथा सामना जिंकणं अत्यावश्यक आहे.

Comments are closed.