ऑक्टोबरमध्ये 1.96 लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन

सणासुदीच्या मागणीमुळे दरकपात होऊनही 4.6 टक्क्यांनी वाढ : जीएसटी सूट दिल्यानंतर लक्षणीय वाढ

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

जीएसटी दरांमध्ये बदल झाल्यानंतर ऑक्टोबरसाठी जीएसटी संकलन जाहीर करण्यात आले आहे. ऑक्टोबरमध्ये एकूण जीएसटी संकलन 4.6 टक्क्यांनी वाढून तब्बल 1.96 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. जीएसटी सूट आणि दसरा-दिवाळीतील सणासुदीच्या काळात झालेल्या जोरदार खरेदीमुळे ही वाढ झाली. ऑक्टोबरमधील जीएसटी संकलनाचे आकडे सणासुदीच्या विक्री आणि वाढत्या मागणीचा परिणाम दर्शवतात. शनिवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार, ऑक्टोबरमध्ये एकूण जीएसटी संकलन 1.96 लाख कोटी रुपये झाल. ऑक्टोबर 2024 मधील 1.87 लाख कोटींपेक्षा ते 4.6 टक्क्यांनी जास्त आहे. तसेच चालूवर्षीच्या मागील दोन महिन्यांपेक्षाही अधिक आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अनुक्रमे 1.86 लाख कोटी आणि 1.89 लाख कोटी रुपये इतके करसंकलन झाले होते.

ऑक्टोबरमध्ये जीएसटी संकलनात झालेली 4.6 टक्के वाढ ही मागील महिन्यांतील सरासरी 9 टक्क्यांच्या वाढीपेक्षा कमी आहे. स्थानिक विक्रीचा निर्देशक असलेला सकल देशांतर्गत महसूल ऑक्टोबरमध्ये 2 टक्क्यांनी वाढून 1.45 लाख कोटी रुपये झाला. दुसरीकडे, आयात कर अंदाजे 13 टक्क्यांनी वाढून 50,884 कोटी रुपये झाला. तर जीएसटी परतावा 26,934 कोटी रुपये झाला. ऑक्टोबर 2025 मध्ये निव्वळ जीएसटी महसूल 1.69 लाख कोटी रुपये झाला. ही रक्कम मागील वर्षाच्या तुलनेत 0.2 टक्के जास्त आहे.

दसरा-दिवाळीमुळे अर्थव्यवस्थेला बहर

जीएसटी दरात कपात झालेली असूनही ऑक्टोबरमध्ये झालेल्या जोरदार सणासुदीच्या खरेदीमुळे एकूण जीएसटी संकलन वाढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीपूर्वी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात जीएसटी दरात कपात करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर, ग्राहकांनी जीएसटी दर कपातीची वाट पाहत त्यांची खरेदी पुढे ढकलली. 22 सप्टेंबर रोजी देशभरात स्वयंपाकघरातील वस्तूंपासून ते इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाईल्सपर्यंत एकूण 375 वस्तूंवर नवीन वस्तू आणि सेवा कर दर लागू करण्यात आले. 22 सप्टेंबर हा नवरात्रीचा पहिला दिवस होता आणि नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी हा शुभ काळ मानला जातो.

Comments are closed.