नोव्हेंबरमध्ये जीएसटी 1.70 लाख कोटी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
नुकत्याच पूर्ण झालेल्या नोव्हेंबर महिन्यात वस्तू-सेवा कराचे समग्र संकलन 1 लाख 70 हजार 276 कोटी रुपये (सर्वसाधारणपणे 1.70 लाख कोटी) इतके झाले आहे. हे प्रमाण गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापेक्षा 0.7 टक्क्यांनी अधिक आहे. गेल्यावर्षीच्या नोव्हेंबरात ते 1 लाख 69 हजार 16 कोटी रुपये होते, अशी माहिती देशाच्या सांख्यिकी विभागाकडून सोमवारी घोषित करण्यात आली आहे.
याच वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात, त्याच्या मागच्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत हे संकलन 4.6 टक्के वाढले होते. तथापि, नोव्हेंबरमध्ये मागच्या नोव्हेबरच्या तुलनेत ते वाढले असले तरी वाढीचे प्रमाण कमी आहे. तरीही ही वाढ समाधानकारक आहे, असे माहितीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
8.9 टक्क्यांची वाढ
या वित्तवर्षाच्या एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांमध्ये वस्तू-सेवा कराचे समग्र संकलन 14 लाख 74 हजार 488 कोटी रुपये इतके झाले आहे. याच्या मागच्या वित्तवर्षाच्या प्रथम आठ महिन्यांमध्ये ते 12 लाख 79 हजार 434 कोटी रुपये होते. त्यामुळे या वर्षीच्या प्रथम आठ महिन्यांमध्ये ते 8.9 टक्के इतक्या समाधानकारक प्रमाणात वाढले आहे, अशीही माहिती सरकारकडून देण्यात आली.
परताव्याच्या प्रमाणात घट
वस्तू-सेवा कराचे उत्पन्न वाढत असतानाच कर परताव्याचे (रिफंड) प्रमाण घटत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी परतावा कमी द्यावा लागला आहे. हे प्रमाण 18,196 कोटी रुपये किंवा 4 टक्के आहे. निर्यात परताव्यात मात्र 3.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर देशांतर्गत परताव्यात 12 टक्क्यांची मोठी घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय वस्तू-सेवा कराचे उत्पन्न काही प्रमाणात घटल्याने परताव्यातही घट झाली असल्याचे दिसून येते, असे काही तज्ञांचे मत आहे.
देशांतर्गत संकलनाची माहिती
नोव्हेंबरात देशांतर्गत व्यापारातून मिळालेले वस्तू-सेवा कर उत्पन्न 1 लाख 24 हजार 300 कोटी इतके आहे. ते गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरात 2 लाख 27 हजार 281 कोटी रुपये होते. ते साधारणत: 3 हजार कोटी रुपयांनी घटल्याचे दिसून येत असले, तरी आयातीतून मिळणाऱ्या समग्र करसंकलनात वाढ झाली आहे. ते नोव्हेंबरात 45 हजार 976 कोटी रुपये इतके झाले आहे. त्यात गेल्या नोव्हेंबरच्या तुलनेत 10.2 टक्के वाढ झालेली आहे. उपभोग्य वस्तूंवरील करांसंकलनात मोठी घट झाली आहे. ते 4 हजार 6 कोटी रुपये इतके आहे. गेल्या नोव्हेंबरात ते 12,950 कोटी रुपये इतके होते, अशी माहिती आहे.
राज्यांच्या संकलनाची तुलना
राज्यस्तरीय वस्तू-सेवा करसंकलनात काही प्रमाणात वाढ दिसत आहे. अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मेघालय आणि आसाम या छोट्या राज्यांमधील करसंकलनात मोठी वाढ दिसून आली आहे. ती सरासरी 33 टक्के इतकी आहे. मात्र, मोठ्या राज्यांच्या करसंकलनात विशेष परिवर्तन झालेले नाही. महाराष्ट्रात वाढ 3 टक्के, कर्नाटकात 5 टक्के, तर केरळमध्ये वाढ 7 टक्के आहे. मात्र, काही राज्यांच्या संकलनात घट झाली आहे. ते राज्यनिहाय प्रमाण गुजरात उणे 7 टक्के, तामिळनाडू उणे 4 टक्के, उत्तर प्रदेश उणे 7 टक्के, मध्यप्रदेश उणे 8 टक्के तर पश्चिम बंगाल उणे 3 टक्के, अशी घट आहे. केंद्रशासित प्रदेशांचा विचार करता अंदमान आणि निकोबार येथे 9 टक्के वाढ तर, लक्षद्विपमध्ये 85 टक्के घट झाल्याचे दिसून आले. एकंदर, करसंकलन स्थिती उत्साहवर्धक असल्याचे दिसते.
करकपातीचा परिणाम
केंद्र सरकारने अनेक वस्तू आणि सेवांवरील करांमध्ये काही महिन्यांपूर्वी कपात पेलेली आहे. या कपातीचा परिणाम वस्तू-सेवा कराच्या संकलनावर दिसून येत आहे. मात्र, दर कमी झाल्याने खप वाढल्यामुळे एकंदर कर संकलनात काहीशी वाढ झाल्याचे मत व्यक्त केले जात आहे. वस्तू-सेवा करात कपात केल्याने ग्राहकांचा लाभ अधिक झाला असून ते अधिकाधिक प्रमाणात खरेदी करण्यासाठी या पुढेही उद्युक्त होत राहतील, अशी अपेक्षा अनेक अर्थतज्ञांनी व्यक्त केली आहे.
पेटी
करसंकलन पातळी समाधानकारक
ड नोव्हेंबर मधील करसंकलनात गेल्या नोव्हेंबरपेक्षा काहीशी अधिक वाढ
ड ग्राहकांकडून अधिक प्रमाणात खरेदी होत असल्याने अर्थव्यवस्थेला वेग
ड आंतरराष्ट्रीय आव्हाने असतानाही करसंकलनाची स्थिती समाधानकारक
Comments are closed.