देवेंद्र दरबारी.. मंत्री रम्मी खेळती भारी! अमोल कोल्हे यांचा निशाणा

शेतकऱ्यांबाबत सातत्याने अवमानकारक वक्तव्य करणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी कोकाटे यांचा एक व्हिडीओ शेअर केला असून यात ते रमी खेळताना दिसत आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी कोकाटे यांच्यावर निशाणा साधला आहे.
याबाबत कोल्हे यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, देवेंद्र दरबारी.. मंत्री रम्मी खेळती भारी! रोज 8-10 शेतकरी आपले आयुष्य संपत आहेत, सरकारने दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण होण्यासाठी, सातबारा कोरा होण्यासाठी शेतकरी मोठ्या आशेने वाट पाहत आहेत…पण कृषिमंत्री मात्र विधिमंडळात ऑनलाईन पत्त्यांचा डाव मांडून बसलेत!हे महाराष्ट्राचं दुर्देव असल्याचे कोल्हे यांनी म्हटले आहे.
देवेंद्र दरबारी.. मंत्री रम्मी खेळती भारी!
रोज ८-१० शेतकरी आपले आयुष्य संपत आहेत, सरकारने दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण होण्यासाठी, सातबारा कोरा होण्यासाठी शेतकरी मोठ्या आशेने वाट पाहत आहेत…
पण कृषिमंत्री मात्र विधिमंडळात ऑनलाईन पत्त्यांचा डाव मांडून बसलेत ! pic.twitter.com/erx9ycgzy4— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) 20 जुलै, 2025
अधिवेशनात सभागृहाचे कामकाज सुरू असताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे चक्क रमी खेळत असल्याचा आरोप शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला. ट्वीट करत रोहित पवार म्हणाले, राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी, असा टोलाही त्यांनी लगावला.
रोहित पवार यांनी आपल्या एक्स (आधीचे ट्विटर) अकाऊंटवर दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. यात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे रमी खेळण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ प्रथम दर्शनी विधिमंडळातील असल्याचे दिसत आहे. यावरून आता माणिकराव कोकाटे यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी. रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा-कर्जमाफी-भावांतर ची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची “कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज” ही आर्त हाक ऐकू येईल का?”, असा सवाल रोहित पवार यांनी एक्सवर केला आहे.
Comments are closed.