IND vs SA: बुमराह-हार्दिकसाठी पहिला T20 सामना ठरणार ऐतिहासिक! अनोख्या शतकाने जमा होणार नावावर मोठी कामगिरी

हार्दिक पांड्या (Hardik pandya) दुखापतीतून सावरल्यानंतर मैदानावर धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. गेल्या काही दिवसांत हार्दिकने त्याच्या फलंदाजीसोबतच गोलंदाजीनेही खूप प्रभावित केले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात हार्दिकला एक मोठा टप्पा गाठण्याची सुवर्णसंधी असेल.

टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू एका ऐतिहासिक कामगिरीपासून फक्त दोन पाऊले दूर आहे. केवळ हार्दिकच नव्हे, तर ‘बूम-बूम’ बुमराह (Jasprit Bumrah) देखील कटक येथील सामन्यात एक विकेट घेताच तो टप्पा गाठेल, जिथे टीम इंडियाच्या जर्सीत आतापर्यंत केवळ अर्शदीप सिंह पोहोचू शकला आहे.
खरं तर, टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम अर्शदीप सिंगच्या (Arshdeep singh) नावावर आहे. अर्शदीप हा एकमेव भारतीय गोलंदाज आहे, ज्याने क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये 100 विकेट्स घेतल्या आहेत.

या यादीत जसप्रीत बुमराह दुसऱ्या क्रमांकावर आहे. बुमराहने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आतापर्यंत 99 विकेट्स घेतल्या आहेत. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात जस्सी (बुमराह) एक विकेट घेताच टी-20 मध्ये भारताकडून 100 विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज बनेल. तर, हार्दिक पांड्या 98 विकेट्ससह या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. हार्दिक कटक येथील सामन्यात जर दोन विकेट्स घेण्यात यशस्वी झाला, तर तो विकेट्सचे शतक पूर्ण करेल.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत टीम इंडियाला हार्दिक पांड्याकडून धडाकेबाज कामगिरीची अपेक्षा आहे. हार्दिकने पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतर सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत भाग घेतला होता. भारतीय अष्टपैलूची बॅट देशांतर्गत स्पर्धेत खूप तळपली होती आणि त्याने एकट्याच्या बळावर बडोद्याला विजय मिळवून दिला होता. हार्दिकच्या आगमनाने टीम इंडियाची फलंदाजीची फळी पूर्वीपेक्षा अधिक संतुलित दिसत आहे. यासोबतच हार्दिक त्याच्या गोलंदाजीनेही आपली छाप पाडू इच्छितो.

Comments are closed.